गुलाबी रंगाने घेतला हत्तीचा बळी? विदेशी फोटोग्राफरचे 'ते' फोटोशूट वादाच्या भोवर्यात; नेमकं सत्य काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 11:33 IST2026-04-01T11:32:23+5:302026-04-01T11:33:20+5:30
जयपुरमध्ये रशियन फोटोग्राफरने हत्तीला गुलाबी रंगात रंगवून फोटोशूट केले, त्यानंतर हत्तीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. प्राणीप्रेमींनी संताप व्यक्त केला असून नेमका काय आहे हा वाद?

गुलाबी रंगाने घेतला हत्तीचा बळी? विदेशी फोटोग्राफरचे 'ते' फोटोशूट वादाच्या भोवर्यात; नेमकं सत्य काय?
गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपुरमध्ये एका विदेशी फोटोग्राफरचे 'पिंक फोटोशूट' सध्या वादाचा मोठा विषय ठरले आहे. एका रशियन फोटोग्राफरने आपल्या कलाकृतीसाठी चक्क एका जिवंत हत्तीला डोक्यापासून पायापर्यंत गुलाबी रंगात रंगवले. धक्कादायक बाब म्हणजे, या फोटोशूटच्या काही काळानंतरच 'चंचल' नावाच्या ६५ वर्षीय हत्तीणीचा मृत्यू झाला. यामुळे राजस्थानसह देशभरातील प्राणीप्रेमींनी संताप व्यक्त केला असून, हे प्राण्यांचे शोषण असल्याची टीका केली जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
रशियन ट्रॅव्हल फोटोग्राफर जूलिया बुरुलेवा ही गेल्या काही दिवसांपासून जयपुरमध्ये होती. राजस्थानची संस्कृती आणि वास्तुकलेने प्रभावित होऊन तिने एका 'पिंक एलिफंट' या संकल्पनेवर फोटोशूट करण्याचे ठरवले. यासाठी तिने स्थानिक हत्ती फार्मच्या मालकांना तयार केले आणि एका जुन्या गणेश मंदिराच्या परिसरात हे फोटोशूट पार पडले. यामध्ये यशस्वी नावाच्या मॉडेललाही गुलाबी रंगाने रंगवून हत्तीवर बसवण्यात आले होते.
हत्तीचा मृत्यू आणि संशयाची सुई
फेब्रुवारी महिन्यात हे फोटोशूट झाले आणि गेल्या महिन्यात 'चंचल' या हत्तीणीचा मृत्यू झाला. या योगायोगामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. "फोटोज सुंदर दिसण्यासाठी एका मुक्या प्राण्याला इतका त्रास देणे किती योग्य आहे?" असा सवाल युजर्स विचारत आहेत. वन्यजीव कार्यकर्त्यांनी याला अत्याचार संबोधून कारवाईची मागणी केली आहे. मात्र, 'हत्ती गाव विकास समिती'चे अध्यक्ष बल्लू खान यांनी स्पष्ट केले की, हत्तीचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला आहे. फोटोशूटसाठी वापरलेले रंग सेंद्रिय गुलाल होते आणि ते लगेच धुवून टाकले होते.
फोटोग्राफरची बाजू काय?
वाढता वाद पाहून फोटोग्राफर जूलियाने स्पष्टीकरण दिले आहे. ती म्हणाली, "राजस्थानमध्ये सण-उत्सवात हत्तींना रंगवण्याची जुनी परंपरा आहे. मी केवळ त्याच परंपरेचा भाग म्हणून हा रंग निवडला. हत्तीच्या सुरक्षेची आम्ही पूर्ण काळजी घेतली होती आणि सुरक्षित रंगांचाच वापर केला होता. ही केवळ एक कलाकृती होती." दरम्यान, मॉडेल शोधण्यासाठी तिला खूप कष्ट पडले, शेवटी यशस्वी नावाच्या मॉडेलने धाडस दाखवून हे शूट पूर्ण केले.
AIचा वापर का केला नाही?
सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी फोटोग्राफरला चांगलेच धारेवर धरले आहे. एका युजरने म्हटले की, "जर तुम्हाला इतकाच गुलाबी हत्ती पाहायचा होता, तर आजच्या काळात 'AI'द्वारे हे सहज शक्य होते. एका वृद्ध प्राण्याला रंगांच्या थरात बुडवून त्याला तासनतास उभे करणे हे क्रौर्य आहे."