भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 09:20 IST2025-05-12T09:20:04+5:302025-05-12T09:20:57+5:30
आपल्या संदेशात भारताने स्पष्ट केले होते की, आपल्याला कुणाच्याही मदतीची आवश्यकता नाही. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताला फायदा व्हावा, यासाठीच अमेरिकेसोबद संपर्क ठेवण्यात आला होता.

भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेला तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेने मध्यस्थी केल्याचे बोलले जात आहे. मात्र माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तांनुसार, यासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट आहे आणि यात अमेरिकेची कसलीही भूमिका नाही. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे सिनेटर मार्को रुबियो यांच्यात 1 मे रोजी पहिल्यांदा चर्चा झाली होती. त्यावेळी, भारताची इच्छा पाकिस्तानवर तगडा प्रहार करण्याची आहे, असे स्पष्ट करण्यात आले होते.
आपल्या संदेशात भारताने स्पष्ट केले होते की, आपल्याला कुणाच्याही मदतीची आवश्यकता नाही. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) भारताला फायदा व्हावा, यासाठीच अमेरिकेसोबद संपर्क ठेवण्यात आला होता.
आधी मुनीर यांच्यासोबत चर्चा, नंतर रुबियो यांचा जयशंकर यांना फोन -
भारताने 10 मे रोजी पाकिस्तानच्या मोठ्या हवाई तळावर हल्ला चढवला होता. यानंतर, दुसऱ्याच दिवशी अमेरिकन मंत्री रुबियो यांनी सर्वात पहिले पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांच्याशी संपर्क साधला होता. यानंतर, त्यांनी जयशंकर यांच्याशी संपर्क साधला. परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर यासंदर्भात भाष्य केले. हा कॉल कोणत्याही सामंजस्य किंवा "ऑफ-रॅम्प" संदर्भात नव्हता.
यावेळी, पाकिस्तान फायरिंग बंद करण्यास तयार आहे, यासाठी भारताची तयारी आहे का? असा प्रश्न मार्को रुबियो यांनी केला होता. याला उत्तर देत, जर त्यांनी हल्ला केला नाही, तर आम्हीही हल्ला करणार नाही. असे भारताने म्हटले होते.
'सीजफायर'संदर्भात डोनाल्ड ट्रंम्प यांनी केली होती घोषणा -
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 'सीजफायर' संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यासंदर्भात भाष्य केले होते. अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यास तयार आहेत, असे ट्रम्प यांनी आपल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले होते. दरम्यान त्यांनी दोन्ही देशांच्या नेत्याचे कौतुकही केलो होते.