हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 18:06 IST2025-12-03T18:05:36+5:302025-12-03T18:06:12+5:30
Dhanbad BCCL Gas Leak Incident: केंदुआडीह पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या राजपूत बस्ती, मस्जिद मोहल्ला आणि परिसरातील इतर भागांत जमिनीला तडे जाऊन त्यातून तीव्र दुर्गंधीसह विषारी वायू बाहेर पडू लागला आहे.

हाहाकार! जमिनीतून अचानक विषारी गॅस बाहेर पडू लागला; धनबादमध्ये मुलाचा मृत्यू, शेकडो पक्षी दगावले
झारखंडमधील धनबाद येथील बीसीसीएल (BCCL - भारत कोकिंग कोल लिमिटेड) खाण क्षेत्राला लागून असलेल्या केंदुआडीह भागात बुधवारी अचानक विषारी वायू गळती झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. जमिनीतून अचानक विषारी वायू बाहेर येऊ लागला, यामुळे एक हजारहून अधिक नागरिक प्रभावित झाले असून, दोन डझनाहून अधिक लोकांना उलटी आणि चक्कर येण्यासारख्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत परिसरातील अनेक पक्ष्यांचा, तसेच पाळीव पोपटांचा मृत्यू झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. तसेच एका मुलाचा मृत्यू झाला आहे.
केंदुआडीह पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या राजपूत बस्ती, मस्जिद मोहल्ला आणि परिसरातील इतर भागांत जमिनीला तडे जाऊन त्यातून तीव्र दुर्गंधीसह विषारी वायू बाहेर पडू लागला आहे. वायूच्या प्रभावामुळे अनेक लहान मुले आणि वृद्ध बेशुद्ध पडले, तर इतरांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. जखमींना तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी हे विषारी वायूच्या संपर्कात आल्यामुळे झाल्याचे स्पष्ट केले आहे.
घटनेची माहिती मिळताच बीसीसीएलची सुरक्षा टीम आणि केंदुआडीह पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बीसीसीएलच्या पथकाने गॅस डिटेक्टर मशीनच्या साहाय्याने वायूच्या गळतीची तीव्रता तपासण्यास सुरुवात केली आहे. बीसीसीएलचे कुसुंडा एरिया सेफ्टी ऑफिसर तुषारकांत यांनी सांगितले की, वायूची दुर्गंधी अधिक आहे, पण त्याचे नेमके प्रमाण अद्याप निश्चित झालेले नाही. गळतीचा स्रोत शोधून तो बुजवण्याचे प्रयत्न तातडीने सुरू आहेत. प्रशासनाने परिसरातील लोकांना लाऊडस्पीकरद्वारे त्वरित सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, बीसीसीएलच्या कार्यक्षेत्रातील ही गंभीर घटना असूनही जिल्हा प्रशासनाचा एकही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित नव्हता, यावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.