Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहिणींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 13:12 IST2025-11-11T13:10:50+5:302025-11-11T13:12:10+5:30
Delhi Blast : रेडिमेड कपड्याचं दुकान चालवणारा शिवा स्फोटात जखमी झाल्याची माहिती कुटुंबीयांना टीव्हीवर बातम्या पाहिल्यानंतर मिळाली.

फोटो - आजतक
दिल्लीस्फोटात अनेक लोकांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. जखमींमध्ये उत्तर प्रदेशातील देवरिया येथील रहिवासी शिवा जयस्वाल याचाही समावेश आहे. भलुअनी बाजारात रेडिमेड कपड्याचं दुकान चालवणारा शिवा स्फोटात जखमी झाल्याची माहिती कुटुंबीयांना टीव्हीवर बातम्या पाहिल्यानंतर मिळाली. यानंतर कुटुंबीय तातडीने दिल्लीला रवाना झाले.
शिवा जयस्वाल जखमी झाल्याचं समजताच नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. शिवा हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा आहे, त्याला चार बहिणी आहेत. त्याला वडील नाहीत आणि त्याची आई माया जयस्वाल कॅन्सरग्रस्त आहे. शिवाची बहीण रंजना जयस्वालने दिलेल्या माहितीनुसार, भाऊ ९ नोव्हेंबरच्या रात्री बसने दिल्लीला गेला होता. कुटुंबाला टीव्हीवर पाहिल्यानंतर तो जखमी झाल्याचं कळलं. शिवाचं रेडिमेड कपड्याचं दुकान आहे आणि तो कपडे खरेदी करण्यासाठी बसने दिल्लीला गेला होता.
"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
शिवा बाजारात खरेदी करत असताना अचानक स्फोट झाला. त्याच्या बहिणींपैकी एक बहीण दिल्लीत राहते. ही बातमी मिळताच संपूर्ण कुटुंबाला काळजी वाटली आणि ते लगेच दिल्लीला रवाना झाले. सध्या शिवा रुग्णालयात दाखल आहे, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कुटुंबावर दुहेरी संकट आलं आहे, कारण त्याची आई आधीच कॅन्सरशी झुंज देत आहे.
"आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
अमरोहा जिल्ह्यातील हसनपूर येथील रहिवासी अशोक कुमार (३४) यांचा दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात मृत्यू झाला. दिल्लीत बस कंडक्टर म्हणून काम करणारे अशोक ड्युटीवरून घरी परतत असताना ही घटना घडली. अशोक त्याच्या कुटुंबाचा एकमेव आधार होते. त्यांच्या वडिलांचं आधीच निधन झालं होतं. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.