Delhi Violence: 'Not a hatred of people, but a feeling of oneness; Criminals propagate violence ' | Delhi Violence : 'लोकांमध्ये वैर नव्हे, तर एकतेची भावना; गुन्हेगार प्रवृत्तीचे हिंसा पसरवतात'

Delhi Violence : 'लोकांमध्ये वैर नव्हे, तर एकतेची भावना; गुन्हेगार प्रवृत्तीचे हिंसा पसरवतात'

ठळक मुद्देअजित डोवाल यांनी बुधवारी मौजपूर भागात जाऊन परिस्थितीची पाहणी केली.'लोकांमध्ये वैर नव्हे, तर एकतेची भावना आहे. गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक हिंसा पसरवतात.''दिल्लीतील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. लोक समाधानी आहेत.'

नवी दिल्ली - दिल्लीतील हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनामध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. सीएए विरोधातील आंदोलनास दिल्ली येथे सोमवारी हिंसाचाराने तडा गेल्यानंतर मंगळवारी आगडोंब उसळला. या हिंसाचारात आतापर्यंत एका पोलिसासह 24 जणांचा बळी गेला आहे. तसेच 200 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बुधवारी (26 फेब्रुवारी) संध्याकाळी मौजपूर भागात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे.

'लोकांमध्ये वैर नव्हे, तर एकतेची भावना आहे. गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक हिंसा पसरवतात. दिल्लीतील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. लोक समाधानी आहेत. सुरक्षा यंत्रणांवर मला पूर्ण विश्वास आहे. पोलीस त्यांचे काम करत आहेत. दिल्लीमध्ये कोणताही गैरप्रकार सहन केला जाणार नाही. आवश्यक पोलीस अधिकारी आणि जवान हे तैनात करण्यात आले आहेत' असं अजित डोवाल यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी दिल्लीतील लोकांशी संवाद साधला आणि सद्य परिस्थिती जाणून घेतली आहे. 

दिल्लीत सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मंगळवारी रात्री उशिरा उत्तर-पूर्व दिल्लीत घटनास्थळावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानंतर सीलमपूरमध्ये उत्तर-पूर्वचे डीसीपी वेद प्रकाश सुर्या यांच्या कार्यालयात बैठक घेतली. दिल्लीतील परिस्थितीवर डोवाल लक्ष ठेवून आहेत. डोवाल आणि अन्य अधिकाऱ्यांनी मौजपूर, जाफराबाद, गोकुलपुरी येथे जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला. 

दिल्लीतील आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जाफराबाद, मौजपूर, चांद बाग, कारावाल नगर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून दंगेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत. दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत हिंसाचार रोखण्यासाठी सर्वपक्षीय मिळून प्रयत्न करू, असे सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली हिंसाचाराबाबत एक ट्विट केलं आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिल्लीकरांना  शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन केले आहे. बुधवारी (26 फेब्रुवारी) मोदींनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी दिल्लीतील परिस्थितीचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. तसेच पोलीस आणि अन्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. 'शांतता आणि सुसंवाद राखणे ही आपली जबाबदारी आहे. मी दिल्लीच्या माझ्या भावांना आणि बहिणींना आवाहन करतो की, त्यांनी कायम शांतता आणि बंधुता जपावी. दिल्ली शहर शांत राहावं आणि लवकरात लवकर पूर्वपदावर यावं हे जास्त महत्त्वाचं आहे' असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
 

English summary :
Delhi Violence National Security Advisor (NSA) Ajit Doval interacts with the local residents of #NortheastDelhi.

Web Title: Delhi Violence: 'Not a hatred of people, but a feeling of oneness; Criminals propagate violence '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.