delhi rohit shekhar tiwari murder accused wife apoorva cause police | पती-पत्नी अन् 'ती'च्या भानगडीत गेला रोहित शेखरचा जीव
पती-पत्नी अन् 'ती'च्या भानगडीत गेला रोहित शेखरचा जीव

नवी दिल्ली- उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नारायण दत्त तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर तिवारी यांची हत्या झाल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे. विशेष म्हणजे रोहित शेखर तिवारीच्या पत्नीनंच त्याचा खून केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी रोहितच्या हत्येचा तपास सुरू केला असता पत्नी अपूर्वावर पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी तिला फैलावर घेतल्यानंतर तिनं हत्येची कबुली दिली. रोहित शेखर आणि त्यांची आई उज्ज्वला शर्मानं दिवंगत नेते नारायण दत्त तिवारी यांच्याकडे स्वतःचा हक्क मागण्यासाठी अनेक वर्षं न्यायालयीन लढाई लढली.

2014मध्ये त्यांच्या या लढाईला यश आलं. आता कुठे रोहित आणि तेच्या आईच्या जीवनातील व्याप संपत आले होते. त्यानंतर उज्ज्वला या रोहितसाठी मुलगी शोधत होत्या. रोहितनं मेट्रोमोनिअल साइटवर अपूर्वाची प्रोफाइल पाहिली. रोहितनं हे आईला सांगितलं आणि दोघेही मुलीकडच्यांना भेटण्यासाठी गेले. रोहितलाही अपूर्वा आवडली, त्यानंतर दोघे लिव्ह इनमध्ये राहू लागले. लग्नानंतर अपूर्वा रोहितबरोबर दिल्लीतल्या डिफेन्स कॉलनी राहायला लागली. दोघांचाही संसाराचा गाडा रुळावर होता. परंतु फार दिवस तो सुस्थितीत चालला नाही. या दोघांच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश झाला. लग्नाच्या वर्षभरानंतर अपूर्वाला रोहितच्या एका मैत्रिणीबद्दल समजलं. ती त्यांची नातेवाईक होती. त्या महिलेवरून रोहित आणि अपूर्वामध्ये खटके उडत होते.

रोहित त्या महिलेला भेटायला जात होता. अपूर्वाला हे आवडायचं नाही. त्यामुळे रोहित आणि अपूर्वाच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला. रोहितकडे असलेली संपत्तीही त्याच्यासाठी डोकेदुखी ठरू लागली. अपूर्वानं रोहितकडे एका घराची मागणी केली होती. परंतु रोहितनं नेहमीच तिच्या मागणीकडे  दुर्लक्ष केलं. यावरून दोघांमध्ये वादही होत होता. रोहित शेखर तिवारी यांचा मंगळवारी संशयास्पद मृत्यू झाला. मॅक्स रुग्णालयामध्ये दूरध्वनी आला, त्यानंतर ऍम्ब्युलन्समधून रोहित शेखर यांना रुग्णालयात आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. शवविच्छेदनानंतर रोहित शेखर यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले. रोहित शेखर तिवारी यांचा मृत्यू गळा दाबल्याने किंवा उशीने तोंड दाबल्याने गुदमरून झाल्याचा निष्कर्ष शवविच्छेदन अहवालामध्ये काढण्यात आला आहे.

यात रोहित शेखरच्या आईने अपूर्वा आणि रोहितचे संबंध चांगले नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे संशयाची सूई त्याच्या पत्नीभोवती फिरत होती. पोलिसांनी अपुर्वाची शनिवारपासून चौकशी सुरु केली होती. त्यानंतर तिने खून केल्याची कबूली दिली. लग्नापासूनच दोघांचे संबंध ताणले गेले होते. त्यानंतर त्याच्या दारूच्या व्यसनामुळे तिने खून केल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, त्या दिवशी रोहितची आई उज्ज्वला साकेत भागातील मॅक्स रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी गेल्या होत्या. त्यावेळीच त्यांना घरातील नोकर आणि दुसरा मुलगा सिध्दार्थने फोन करून रोहितच्या नाकातून रक्त येत असून तो बेशुद्ध  पडला असल्याचे सांगितले होते. 
 


Web Title: delhi rohit shekhar tiwari murder accused wife apoorva cause police
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.