दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:53 IST2025-11-13T16:52:18+5:302025-11-13T16:53:40+5:30
Delhi Red Fort Car Blast Updates: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात १०हून जास्त लोकांचा मृत्यू

दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
Delhi Red Fort Car Blast Updates: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात १०हून जास्त लोकांचा मृत्यू झाला. हा स्फोट घडवून आणण्यामागे कुणाचे आर्थिक पाठबळ होते, कुणाचे फंडिंग होते? या गोष्टींची चौकशी केली जाणार आहे. ईडी आणि इतर एजन्सींसह NIA ही चौकशी करेल. अल-फलाह विद्यापीठाचाही संपूर्ण फॉरेन्सिक तपास व चौकशी केली जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी गृहसचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, एनआयएचे महासंचालक आणि गृह मंत्रालयाच्या इतर उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यात हे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
कुणी दिले पैसे?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत असा निर्णय घेण्यात आला की एनआयए, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि इतर आर्थिक तपास संस्थांसह, लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणातील आर्थिक बाबींची म्हणजे फंडिंगची चौकशी करेल. अल-फलाह विद्यापीठाची फॉरेन्सिक चौकशी देखील केली जाईल. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि इतर आर्थिक तपास संस्था विद्यापीठाशी संबंधित एका डॉक्टरच्या आर्थिक व्यवहारांची देखील चौकशी करतील. या संपूर्ण प्रकरणात टेरर फंडिंग आणि मनी लाँडरिंगसारख्या आर्थिक बाबींची चौकशी केली जाईल.
डॉक्टर फारुखला उत्तर प्रदेशातून अटक
या प्रकरणात अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील हापूर येथील डॉक्टर डॉ. फारूक यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. डॉ. फारूक हा जीएस मेडिकल कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक आहे आणि त्याने अल-फलाह विद्यापीठातून एमबीबीएस केले आहे. बॉम्बस्फोट प्रकरणासंदर्भात डॉ. फारूकची चौकशी सुरू आहे.
अल-फलाह विद्यापीठाला NAAC कडून नोटीस जारी
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोट प्रकरणी तपास यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. यंत्रणांना महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. स्फोटांप्रकरणी फरिदाबाद येथील अल-फलाह मेडिकल कॉलेज चौकशीच्या कक्षेत आहे. दरम्यान, राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेने (NAAC) अल-फलाह विद्यापीठाने त्यांच्या वेबसाइटवर मान्यता दाखवली होती, ही मान्यता खोटी आहे. या प्रकरणी आता कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.