'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 19:50 IST2025-11-17T19:48:50+5:302025-11-17T19:50:09+5:30
राजधानी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात १० नोव्हेंबर 2025 रोजी (सोमवारी) झालेल्या भीषण स्फोटाच्या तपासात एक धक्कादायक आणि मोठी माहिती ...

'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
राजधानी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात १० नोव्हेंबर 2025 रोजी (सोमवारी) झालेल्या भीषण स्फोटाच्या तपासात एक धक्कादायक आणि मोठी माहिती समोर आली आहे. माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्याम माहितीनुसार, या स्फोटात जैश-ए-मोहम्मदचा फिदायीन दहशतवादी डॉ. उमर उन नबीने 'बूट बॉम्बचा' वापर केल्यी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला तर २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
या प्रकरणी तपास यंत्रणांकडून कसून तपास केला जात आहे. हल्ल्यानंतर, यंत्रणांनी घटनास्थळावरून अनेक पुरावे एकत्र केले होते. यात उमरने हल्ल्यासाठी वापरलेल्या i20 कारमधून जप्त करण्यात आलेल्या एका बुटावर अत्यंत धोकादायक स्फोटक टीएटीपी (TATP) चे अंश आढळले आहेत. TATP अर्थात 'ट्रायएसिटोन ट्रायपेरॉक्साइड' (Triacetone Triperoxide) हे अत्यंत संवेदनशील असते. एवढे संवेदनशील की, हलक्याशा घर्षणाने अथवा उष्णतेनेही त्याचा स्फोट होऊ शकतो. यामुळेच याला 'शैतान की मां' म्हणजेच 'सैतानाची आई' (Mother of Satan) असेही म्हटले जाते.
फिदायीन हल्ला करणाऱ्या डॉ. उमरने i20 मध्ये जे स्फोटक ठेवले होते, त्याचा ब्लास्ट करण्यासाठी बूटांमध्ये टीएटीपी ठेवले आणि त्याचा ब्लास्टसाठी वापर केला असावा, असे मानले जात आहे. कारण टीएटीपीचे काही अंश उमरच्या बुटावर आणि गाडीच्या टायरवरही आढळून आले आहेत. महत्वाचे म्हणजे, जैश-ए-मुहम्मदच्या दहशतवाद्यांनी मोठ्या हल्ला घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात टीएटीपी जमा केले होते आणि लाल किल्ला परिसरातील ब्लासमध्ये टीएटीपी आणि अमोनियम नायट्रेटच्या मिश्रणाचा वापर करण्यात आला, अशी पुष्टी तपास पथकांनी केली आहे.
दरम्यान, या स्फोटापूर्वी फरीदाबादमधून दहशतवादी डॉक्टरांच्या ठिकाणांवरून तब्बल २९०० किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले होते. या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक जण जखमी झाले आहे.