दिल्ली पोलिसांची कारवाई; पाकिस्तानातून शस्त्रांची तस्करी करणारी टोळी जेरबंद, 10 जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:37 IST2026-03-25T13:36:53+5:302026-03-25T13:37:39+5:30
पाकिस्तान-नेपाळ मार्गे भारतात तस्करी

दिल्ली पोलिसांची कारवाई; पाकिस्तानातून शस्त्रांची तस्करी करणारी टोळी जेरबंद, 10 जणांना अटक
नवी दिल्ली :दिल्लीपोलिसांच्या क्राइम ब्रांचने मोठी कारवाई करत आंतरराष्ट्रीय स्तरावर शस्त्रांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 10 आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात विदेशी शस्त्रास्त्रे आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
मोठ्या प्रमाणात विदेशी शस्त्रास्त्रे जप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून 21 विदेशी पिस्तुल, सब-मशीन गन, 200 जिवंत काडतुसे आणि ऑटोमॅटिक पिस्तुल जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये विविध देशांत तयार झालेल्या अत्याधुनिक पिस्तुलांचा समावेश आहे. यामध्ये PX-5.7, Stoeger (तुर्की), PX-3 (चीन), Shadow CZ (चेक गणराज्य), Beretta (इटली), Taurus (ब्राझील) आणि Walther (जर्मनी)चा समावेश आहे. विशेष म्हणजे PX-5.7 हे शस्त्र प्रामुख्याने स्पेशल फोर्सेसकडून वापरले जाते, त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.
पाकिस्तान-नेपाळ मार्गे भारतात तस्करी
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ही शस्त्रे पाकिस्तानमधून भारत-नेपाळ सीमेच्या मार्गे भारतात तस्करी करून आणली जात होती. त्यानंतर ही शस्त्रे दिल्ली-NCR तसेच इतर राज्यांतील गुन्हेगारी टोळ्यांना पुरवली जात होती.
पोलिसांच्या मते, हा गट केवळ आंतरराज्यीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर शस्त्र पुरवठा करणाऱ्या नेटवर्कशी जोडलेला होता. या रॅकेटचे संबंध पाकिस्तान, नेपाळ आणि बांग्लादेशमधील अवैध शस्त्र पुरवठादारांशी असल्याचेही तपासात समोर आले आहे.
आणखी आरोपींचा शोध सुरू
सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून, या नेटवर्कशी संबंधित इतर लोकांचा शोध घेतला जात आहे. दिल्ली पोलिसांच्या या कारवाईमुळे मोठ्या शस्त्र तस्करी रॅकेटचा भंडाफोड झाला असून गुन्हेगारी टोळ्यांना होणारा शस्त्र पुरवठा रोखण्यात मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.