दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर मोठा अपघात; स्कूल व्हॅनची डंपरला धडक, दोघांचा मृत्यू, 9 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 16:52 IST2024-03-30T16:44:12+5:302024-03-30T16:52:41+5:30
दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वेवर स्कूल व्हॅन आणि डंपर यांच्यात झालेल्या धडकेनंतर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात स्कूल व्हॅनचा चालक आणि एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला

दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर मोठा अपघात; स्कूल व्हॅनची डंपरला धडक, दोघांचा मृत्यू, 9 जण जखमी
गाझियाबादच्या दिल्ली मेरठ एक्स्प्रेस वेवर स्कूल व्हॅन आणि डंपर यांच्यात झालेल्या धडकेनंतर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात स्कूल व्हॅनचा चालक आणि एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्कूल व्हॅनमध्ये ड्रायव्हर व्यतिरिक्त 11 मुलं प्रवास करत होती ज्यांचा अपघात झाला. या घटनेनंतर जखमी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वजण अमरोहाहून दिल्ली जामिया विद्यापीठाकडे जात होते.
मुलांचं वय अंदाजे 10 ते 13 वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, चालक आणि एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित जखमींना गाझियाबादच्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलीस अपघाताचा तपास करण्यात व्यस्त आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, स्कूल व्हॅनचं मोठं नुकसान झालं.
शनिवारी सकाळी 6.30 ते 7.00 च्या दरम्यान शाळकरी मुलांना घेऊन जाणारी एर्टिगा कार दिल्लीतील जामियाला जात असताना ही घटना घडली. सर्व मुलं अमरोहा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. अपघातग्रस्त गाडीतून मुलांना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले.
गंभीररित्या जखमी झालेल्या मुलांना जवळच्या मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर इतर मुलांना सर्वोदय आणि सीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किरकोळ जखमी मुलाला एमजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या संपूर्ण अपघाताचा तपास करण्यात व्यस्त आहेत. एसीपीच्या म्हणण्यानुसार, सीसीटीव्हीच्या आधारे हा अपघात कोणत्या वेळी आणि कोणत्या कारणामुळे झाला, याची माहिती घेत आहेत.