६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 08:27 IST2025-11-13T07:39:37+5:302025-11-13T08:27:39+5:30
Delhi Blast Update: लाल किल्ल्याजवळ झालेला भयंकर स्फोट हा केवळ अपघात नव्हता तर तो ६ डिसेंबर, म्हणजे बाबरी मशीद पाडल्याच्या दिनाशी साधर्म्य ठेवून घडवायचा नियोजित दहशतवादी हल्ला होता, असे तपासात उघड झाले आहे.

६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
नवी दिल्ली / श्रीनगर - लाल किल्ल्याजवळ झालेला भयंकर स्फोट हा केवळ अपघात नव्हता तर तो ६ डिसेंबर, म्हणजे बाबरी मशीद पाडल्याच्या दिनाशी साधर्म्य ठेवून घडवायचा नियोजित दहशतवादी हल्ला होता, असे तपासात उघड झाले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, फरीदाबाद मॉड्यूल वेळेवर उघडकीस आले नसते, तर ६ डिसेंबरला दिल्लीला हादरवणारा स्फोट झाला असता. स्फोटकांनी भरलेली कार चालवणारा २८ वर्षीय डॉ. उमर नबी या कटाचा सूत्रधार होता.
उमर नबी हा दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्याचा रहिवासी असून, फरीदाबादमधील अल फलाह मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत होता. तपासात असे दिसून आले की, उमर हा जैश-ए-मोहम्मद या बंदी असलेल्या संघटनेशी संबंधित ‘व्हाइट-कॉलर’ मॉड्यूलचा प्रमुख भाग होता. ज्याचे जाळे काश्मीर, हरयाणा व उत्तर प्रदेशपर्यंत पसरले होते. डॉ. मुझमिल अहमद गनीच्या अटकेनंतर उमरची योजना फसली. गनीच्या घरातून ३६० किलो अमोनियम नायट्रेट सापडल्यानंतर उमर घाबरला आणि १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेला स्फोट बहुधा घाईत घडवलेला असावा, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. या प्रकरणात आठ जणांना अटक झाली आहे. त्यातले सात काश्मीर तर एक जण लखनौचा आहे. अरिफ निसार डार, यासीर-उल-अशरफ, मकसूद अहमद डार (सर्व श्रीनगरचे), मौलवी इरफान अहमद (शोपियान), झमीर अहमद आहंगर (गंदरबल), डॉ. मुझमिल गनी (पुलवामा), डॉ. आदिल (कुलगाम) आणि डॉ. शाहीद सईद (लखनौ) यांचा त्यात समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जखमींची घेतली भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्याजवळील स्फोटात जखमी झालेल्यांची बुधवारी एलएनजेपी रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली.
मोदींनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी सर्वजण लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. या कटामागे जो कोणी असेल त्याला न्यायाच्या कक्षेत आणले जाईल.
दिल्लीस्फोट दहशतवादी कृत्यच : राजधानीत १० नोव्हेंबरला लाल किल्ल्यानजीक चांदणी चौकात कारस्फोट झाला ते देशद्रोही शक्तींकडून झालेले दहशतवादी कृत्यच होते, असे सरकारने स्पष्ट केले. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी कॅबिनेट सुरक्षा कमिटीची विशेष बैठक झाली. या बैठकीत दिल्ली स्फोटाची सखोल चौकशी केली जाईल असे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
तुर्कीहून सुरू झाला कटाचा प्रवास
अधिकाऱ्यांच्या मते, उमर आणि गनी २०२१ साली तुर्की दौऱ्यावर गेले होते, तिथेच त्यांचा संपर्क जैशच्या ओव्हरग्राउंड वर्कर्सशी आला. अत्यंत हुशार असलेला उमर त्या भेटीनंतर अतिरेकी विचारसरणीकडे झुकला.
तुर्कीहून परतल्यानंतर दोघांनी ६ डिसेंबरच्या आसपास एक मोठा कार बॉम्बस्फोट करण्याची योजना आखली. उमरने इंटरनेटवरून आयईडी तयार करण्याचे व सर्किट बसवण्याचे धडे घेतल्याचे तपासातून कळते.
‘एटीएस’कडून पुणे, मुंब्रा येथील संशयितांची झाडाझडती
पुणे : दहशतवादविरोधी पथकाने ठाण्यातील मुंब्रा येथील शिक्षक इब्राहिम आबिदी याची बुधवारी चौकशी केली. एका संगणक अभियंत्याला अल-कायदाशी कथित संबंध असल्याच्या आरोपावरून आधीच अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या धागेदोऱ्यांमुळे पथकाने मुंब्रा येथे शिक्षकाच्या घरी धडक दिली.
अटकेतील अभियंता जुबेर हंगरगेकर (३२) याच्या मोबाइलमधून महत्त्वाची माहिती मिळाल्याचे एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. जुबेर मूळचा सोलापूरचा आहे. त्याच्या मोबाइलमध्ये पाकिस्तान, सौदी अरेबिया, कुवेत, ओमानमधील पाच जणांचे क्रमांक आहेत. त्याच्या संपर्कात असलेल्या १८ जणांचे जबाब नोंदवले आहेत.