कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 06:18 IST2025-11-12T06:17:49+5:302025-11-12T06:18:19+5:30

Delhi Blast Update: लालकिल्ल्याजवळील स्फोट प्रकरणात तपासकर्त्यांनी पुलवामा येथील एका डॉक्टरवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध आहेत आणि मुख्यतः फरिदाबादमधून स्फोटके जप्त करण्यात आल्याच्या घटनेशी त्याचा संबंध आहे.

Delhi Blast Update: Doctor driving car linked to terror module, among those killed | कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

नवी दिल्ली / श्रीनगर -  लालकिल्ल्याजवळील स्फोट प्रकरणात तपासकर्त्यांनी पुलवामा येथील एका डॉक्टरवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध आहेत आणि मुख्यतः फरिदाबादमधून स्फोटके जप्त करण्यात आल्याच्या घटनेशी त्याचा संबंध आहे. डॉ. उमर नबी हा स्फोट झालेली कार चालवत होता आणि स्फोटात ठार झालेल्या १२ जणांत त्याचा समावेश असावा, असे मानले जात आहे.

मंगळवारी जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी त्याच्या आईचा डीएनए नमुना घेतला असून, त्यावरून त्याचा संबंध निश्चित होईल. सोमवारी २,९०० किलो स्फोटके जप्त केल्यानंतर तीन डॉक्टरसह आठजणांना गजाआड करण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये डॉ. मुझम्मिल गनी आणि डॉ. शाहीन सईदचा समावेश आहे, दोघेही फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठाशी संबंधित आहेत. तेथून ३६० किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले. शाहीन भारतात जैश-ए-मोहम्मदच्या महिला भरती शाखेचे नेतृत्व करत होती. ती या गटाची महिला शाखा जमात-उल-मोमिनतची प्रमुख होती. 

तिचे वडील सय्यद अहमद अन्सारी यांनी लखनौमध्ये पत्रकारांना सांगितले की, त्यांना तिच्या अटकेची माहिती माध्यमांद्वारे मिळाली. मी शेवटचे शाहीनशी महिनाभरापूर्वी बोललो होतो. मी तिच्याकडून डॉ. मुझम्मिल किंवा अशा कारवायांशी संबंधित कोणत्याही व्यक्तीचा उल्लेख कधीच ऐकला नव्हता.

स्फोट घडवून आणणारी कार डॉ. उमर चालवत होता, असे तपासात पुढे आले आहे. इतर साथीदार डॉक्टरांप्रमाणे तो पकडला जाईल, अशी त्याला भीती होती, म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे मानले जात आहे. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथील या डॉक्टरने कारमध्ये स्फोटके बाळगल्याचे सूत्रांनी सांगितले. हा आत्मघाती हल्ला असण्याची शक्यता नाकारता आलेली नाही. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील तारिक नावाच्या व्यक्तीने उमरला आय-२० कार दिली होती. 

मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत : रेखा गुप्ता
नवी दिल्ली : कार बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केली आहे. 
या स्फोटात जखमी झाल्याने कायमचे 
अपंगत्व अलेल्या लोकांना प्रत्येकी पाच लाख रुपये, तर इतर जखमींना दोन लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मास्क घातलेला...
पोलिसांनी सांगितले की, स्फोट झालेली कार मास्क घातलेली व्यक्ती चालवत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. लालकिल्ला आणि त्याच्या आसपासच्या मार्गांवरील सीसीटीव्ही स्कॅन करण्यासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत. स्फोटापूर्वी, जवळच्या पार्किंगमध्ये तीन तास वाहन उभे होते. संशयितांना शोधण्यासाठी दर्यागंज आणि पहाडगंज भागातील हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसमध्ये रात्रभर शोध मोहीम राबविण्यात आली.

कार चालकाच्या आईची होणार डीएनए चाचणी
श्रीनगर : राष्ट्रीय राजधानीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात वापरलेली कार चालवल्याचा संशय असलेल्या व्यक्तीच्या आईला पोलिसांनी मंगळवारी जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात डीएनए चाचणीसाठी बोलावले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्फोटात वापरण्यात आलेली आय२० कार डॉ. उमर नबी चालवत होता. तो पुलवामातील कोइल गावचा रहिवासी होता. संशयिताचे दोन भाऊ त्यांच्या आईसह रुग्णालयात पोहोचले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्फोटात वापरलेल्या कारच्या खरेदी-विक्रीत सहभागी असलेल्या तीन जणांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. 
उमर नबीची वहिनी मुझम्मिल म्हणाली की, कुटुंबाला विश्वासच बसत नव्हता की तो दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असू शकतो. तो लहानपणापासूनच अंतर्मुख होता. त्याचे जास्त मित्र नव्हते. तो फक्त अभ्यासावर आणि कामावर लक्ष केंद्रित करत असे. तो फरिदाबादमधील एका महाविद्यालयात शिकवत असे. 

यूएपीए आणि स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत एफआयआर 
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाला बॉम्बस्फोट म्हटले आहे आणि बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत दहशतवादी कृत्य केल्याबद्दल कट रचणे आणि शिक्षेशी संबंधित कलमे या घटनेत लावण्यात आली आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिल्ली पोलिस अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत. राष्ट्रीय राजधानीत ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे आणि विमानतळ, रेल्वे स्थानके आणि बस टर्मिनल्सवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या मते, बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायदा (यूएपीए), स्फोटक पदार्थ कायदा आणि आयपीसीच्या कलमांखाली पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. दहशतवादी कृत्यासाठी कट रचण्याशी संबंधित यूएपीएच्या कलम १६ व १८ अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

पोलिस चौकीच्या भिंतीचे नुकसान
एफआयआरमध्ये असेही नमूद केले आहे की, स्फोटात दिल्ली पोलिस चौकीच्या भिंतीचे नुकसान झाले आहे.  एफआयआरमध्ये तक्रारदार विनोद नैन आहेत. ते लाल किल्ल्यावरील चौकीचे प्रभारी आहेत. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, एक मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे चौकीची भिंत कोसळली.  पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि जखमी रस्त्यावर पडलेले असताना गाड्या जळताना दिसल्या. 

Web Title : डॉक्टर का आतंकी संबंध: लाल किले के पास कार विस्फोट, मौतें हुईं।

Web Summary : दिल्ली के लाल किले के पास एक कार चलाने वाले डॉक्टर पर विस्फोट के बाद आतंकी संबंधों का संदेह है। विस्फोटक जब्त किए गए, और विश्वविद्यालय से जुड़े डॉक्टरों सहित गिरफ्तारियां हुईं। माना जा रहा है कि चालक विस्फोट में मारा गया। परिजनों को मुआवजा मिलेगा।

Web Title : Doctor's terror link: Car blast near Red Fort, fatalities reported.

Web Summary : A doctor driving a car near Delhi's Red Fort is suspected of terror links after an explosion. Explosives were seized, and arrests made, including doctors linked to a university. The driver is presumed dead in the blast. Families will receive compensation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.