Delhi Blast: दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी किती पैसे दिले गेले होते, डॉ. शाहीनची काय होती भूमिका?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 16:28 IST2025-11-17T16:23:27+5:302025-11-17T16:28:42+5:30
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटाचा तपास एनआयए स्थानिक पोलीस आणि इतर राज्यातील पोलिसांच्या मदतीने करत आहे. या स्फोट प्रकरणात अनेकांना अटक झाली असून, दररोज नवीन माहिती समोर येत आहे.

Delhi Blast: दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी किती पैसे दिले गेले होते, डॉ. शाहीनची काय होती भूमिका?
Red Fort Blast: देशाची राजधानी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाचे धागेदौरे जम्मू काश्मीर, हरयाणा आणि उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात स्थानिक पोलीस आणि एनआयएने अनेकांना अटक केली असून, ज्यांनी हा स्फोट घडवला त्या दहशतवाद्यांना यासाठी पैसेही दिले गेले होते. डॉक्टर टेरर मॉड्यूलमधील सगळ्यांना पैसे देण्याचे काम डॉक्टर शाहीन शहीदने केले होते.
एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तामध्ये दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील दहशतवाद्यांना पैसे दिले गेले होते, असे वृत्त प्रसिद्ध केले आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर १ जवळ झालेल्या या स्फोटासाठी दहशतवाद्यांना २० लाख रुपये दिले गेले होते, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
१३ लोकांचा जीव घेणाऱ्या आणि ३० पेक्षा अधिक लोक जखमी झालेली ही घटना, आत्मघाती स्फोटाची असल्याचे केंद्रीय तपास यंत्रणांचा प्राथमिक अंदाज आहे. आय२० कारमध्ये झालेल्या या स्फोटात कार चालवणारा दहशतवादीही ठार झाला होता.
शाहीन शहीदने वाटले पैसे
केंद्रीय तपास यंत्रणांनी आतापर्यंत केलेल्या तपासातून समोर आले आहे की, दिल्लीत बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी २० लाख रुपये डॉक्टर शाहीन शहीदकडून दहशतवाद्यांच्या गटाला दिले गेले होते. शाहीन शहीदने यासाठी अनेक मार्गाने मदत केली.
२००१ मध्ये पॅरिसवरून मियामीला जात असलेल्या अमेरिकन हवाई वाहतूक कंपनीच्या विमानात रिचर्ड रीड नावाच्या एका व्यक्तीने बूटांमध्ये विध्वंसक TATP चा स्फोट घडवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच पद्धतीने दिल्लीत उमर मोहम्मदने हा स्फोट घडवला असल्याचा संशय आहे. आतापर्यंतच्या तपासात तसे पुरावेही तपास यंत्रणांना मिळाले आहेत.