बुरहान वानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? डॉ. उमर बद्दल मोठा खुलासा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 23:04 IST2025-11-25T23:04:10+5:302025-11-25T23:04:46+5:30
Delhi Blast: दिल्ली बॉम्ब ब्लास्टबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.

बुरहान वानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? डॉ. उमर बद्दल मोठा खुलासा...
Delhi Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबरला झालेल्या कार ब्लास्टच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हल्ल्याचा मुख्य आरोपी डॉ. उमर याबद्दल मोठा खुलासा झाला आहे. तो एकीकडे ISIS ‘दाएश’ मॉड्यूलने प्रभावित होता, तर त्याचे इतर साथीदार अल-कायदा मॉड्यूल फॉलो करायचे. यामुळे त्यांच्यात वारंवार संघर्ष होत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
फंडिंगपासून विचारसरणीपर्यंत, गटात सतत मतभेद
तपासातील माहितीनुसार, हवाला मार्गे सुमारे 20 लाख रुपये, तर एका जमात कडून 40 लाख रुपये गटाला मिळाले होते. या निधीचा वापर कसा करायचा, यावरूनही सतत वाद होत होते. ऑक्टोबरमध्ये अंतर्गत वाद सोडवण्यासाठी उमर काजीगुंड येथे गेला होता, परंतु काही साथीदारांच्या अटकेची माहिती मिळताच तो तातडीने परतला.
बुरहान वानीच्या मृत्यूचा ‘बदला’ घेण्याची भाषा
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2016 मध्ये हिज्बुल कमांडर बुरहान वानीला ठार केल्यानंतर काश्मीरमध्ये झालेल्या प्रदर्शनात उमरने सक्रिय सहभाग घेतला होता. तो वानीच्या मृत्यूचा बदला घेण्याबाबतही बोलत असल्याची पुष्टी झाली आहे.
कलम 370 हटल्यानंतर उमर बराच अस्वस्थ व चिडलेला होता. तपासात उघड झाले आहे की, 2023 पासून तो IED तयार करण्याच्या तांत्रिक संशोधनात गुंतलेला होता. त्याने डॉ. आदिल अहमद राठर आणि डॉ. मुजम्मिल यांना या संदर्भात मार्गदर्शन केले. या काळात तो जैश-ए-मोहम्मदच्या सभा आणि भारत-विरोधी भाषणही ऐकत असल्याचे समोर आले आहे.
लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबरला झालेला स्फोट
दिल्लीमध्ये 10 नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याच्या जवळ उभ्या असलेल्या कारमध्ये मोठा स्फोट झाला. या घटनेत 15 जणांचा मृत्यू, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. तपासात उघड होत असलेल्या प्रत्येक बाबीवर तपास यंत्रणा स्वतंत्ररीत्या पडताळणी करत आहेत.
उमरचा ‘सूटकेस’ तपासाचा सर्वात मोठा पुरावा
तपास एजन्सींच्या चौकशीत डॉ. मुजम्मिलने सांगितले की, उमरकडे एक विशेष सूटकेस होती, जी त्याच्या कटकारस्थानांचा सर्वात मोठा पुरावा आहे. ही सूटकेस उघडताच सुरक्षा एजन्सींना मोठ्या प्रमाणात पुरावे मिळाले. यात IED तयार करण्याचे साहित्यही सापडल्याची माहिती आहे. मुजम्मिलच्या कबुलीनुसार, उमर, आदिल, मुजम्मिल आणि मुफ्ती इरफान मिळून एक मोठा कट रचत होते, ज्याचा प्रमुख डॉ. उमरच होता.