दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 18:55 IST2025-11-14T18:55:10+5:302025-11-14T18:55:41+5:30
Delhi Red Fort blast: तपास यंत्रणांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, या स्फोटामागील मुख्य सूत्रधार डॉ. उमर उन नबी असल्याचे उघड झाले आहे. नबी हा जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित होता आणि तो तुर्कस्तानस्थित 'उकासा' नावाच्या हँडलरच्या संपर्कात होता.

दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या भीषण कार स्फोटाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. या स्फोटात १३ हून अधिक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. केंद्र सरकारने या घटनेला 'दहशतवादी कृत्य' म्हणून घोषित केले असून, या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे.
तपास यंत्रणांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, या स्फोटामागील मुख्य सूत्रधार डॉ. उमर उन नबी असल्याचे उघड झाले आहे. नबी हा जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित होता आणि तो तुर्कस्तानस्थित 'उकासा' नावाच्या हँडलरच्या संपर्कात होता. स्फोटाचा कट हा जानेवारी महिन्यापासून शिजत होता आणि त्यासाठी लाल किल्ल्याची रेकीही करण्यात आली होती. या स्फोटाच्या तपासात आतापर्यंतचे सर्वात मोठे यश म्हणून, दिल्ली पोलिसांनी संशयित आरोपी उमर उन नबी याच्याशी संबंधित असलेली लाल रंगाची फोर्ड इकोस्पोर्ट SUV कार हरियाणातील फरीदाबादजवळ सापडली आहे.
गुरुवारी रात्री सुरक्षा दलांनी पुलवामा येथील दहशतवादी डॉ. उमर नबी याचे घर आयईडी स्फोटाने उडवून दिले. पुलवामाच्या कोइल भागात तो राहत होता. पोलिसांनी त्याच्या कुटुंबाचे व त्याचे डीएनए सॅम्पल घेतले होते. ते मॅच होताच ही कारवाई करण्यात आली आहे.
बाबरी पाडली त्या सहा डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
आतापर्यंत अटक केलेल्या आठ दहशतवाद्यांनी बाबरी मशीद पाडल्याच्या वर्धापनदिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी दिल्लीसह देशभरात विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याचा त्यांचा हेतू असल्याचे सांगितले होते, असे गुप्तचर यंत्रणांनी उघड केले आहे. यासाठी त्यांनी ३२ कारची व्यवस्था केली होती.