दिल्ली स्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठ रडारवर; 200 हून अधिक शिक्षक-डॉक्टरांची चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 15:33 IST2025-11-20T15:32:44+5:302025-11-20T15:33:53+5:30
Delhi Blast: विद्यापीठ कॅम्पसमध्ये NIA, दिल्ली स्पेशल सेल, UP ATS, फरीदाबाद क्राइम ब्रांच आणि J&K पोलीस तळ ठोकून आहेत.

दिल्ली स्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठ रडारवर; 200 हून अधिक शिक्षक-डॉक्टरांची चौकशी
Delhi Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर तपासयंत्रणांनी फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठावरील कारवाईचा फास आवळला आहे. विद्यापीठाशी संबंधित 200 पेक्षा जास्त डॉक्टर, लेक्चरर आणि स्टाफ तपासाच्या कक्षेत आले असून, हॉस्टेल्स व बाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खोल्यांची झाडाझडती सुरू आहे. आतापर्यंत 1000 पेक्षा जास्त लोकांची चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूलचा धागा विद्यापीठापर्यंत
स्फोटानंतर उमर-उन-नबी या आत्मघाती दहशतवाद्याच्या कनेक्शनमुळे अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या भोवऱ्यात सापडले. अनेकांनी आपला मोबाईल डेटा डिलीट केल्याचे दिसून आले असून, त्याचेही डिजिटल फॉरेन्सिक विश्लेषण सुरू आहे. अशातच, बुधवारी विद्यापीठातील अनेक कर्मचारी स्वतःचे सामान घेऊन कॅम्पस सोडताना आढळले. सूत्रांच्या मते, स्फोटानंतर अनेकांनी तातडीने ‘रजा’ घेऊन घर गाठले आहे.
नूहमध्ये 35 वर्षीय महिलेसह 7 जणांची चौकशी
नूहच्या हिदायत कॉलनीत उमरला खोली भाड्याने देणारी 35 वर्षीय महिलेला ताब्यात घेतले आहे. स्फोटानंतर ती फरार होती. तिच्या कुटुंबीयांचीही चौकशी सुरू आहे. उमरने नूहमध्ये असताना अनेक मोबाइल नंबर वापरले होते. नूहमधील 7 इतर जणांनाही ताब्यात घेऊन त्यांचे उमरशी संबंध तपासले जात आहेत.
स्फोटानंतर अल-फलाह हॉस्पिटलमध्ये ‘OPD’ रुग्णांची संख्या अर्ध्यावर
पूर्वी रोज 200 च्या आसपास रुग्ण येत असलेल्या अल-फलाह रुग्णालयात आता 100 पेक्षा कमी OPD रुग्ण येत आहेत. तपास यंत्रणांना संशय आहे की, उमरला हॉस्पिटलमध्ये विशेष सुविधा देण्यात येत होती.
उमरबाबत धक्कादायक माहिती उघड
उमर 2023 मध्ये सलग 6 महिने विनाअनुमती गायब होता. परतल्यानंतर त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता त्याला थेट ड्युटीवर ठेवले. आठवड्यात फक्त 1-2 अल्पकालीन लेक्चर घेत असे. त्याला नेहमी संध्याकाळ किंवा रात्रपाळी दिली जात असे; सकाळची शिफ्ट कधी देण्यात आली नाही. या सर्व बाबींमुळे विद्यापीठाच्या आत काहीतरी हँडलर होते का? हा प्रश्न तपासयंत्रणांसमोर निर्माण झाला आहे.
विद्यापीठात तात्पुरते कमांड सेंटर उभारले
कॅम्पसमध्ये NIA, दिल्ली स्पेशल सेल, UP ATS, फरीदाबाद क्राइम ब्रांच आणि J&K पोलीस अशा अनेक यंत्रणा तळ ठोकून आहेत. मंगळवारी ED ची टीमदेखील येथे पोहोचली. सर्व एजन्सींनी विद्यापीठातच तात्पुरते कमांड सेंटर उभारले आहे.
अनंतनागमध्ये डॉक्टर-स्टाफच्या लॉकरांची तपासणी
जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग येथील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर आणि स्टाफच्या लॉकरांची मोठ्या प्रमाणावर झडती घेतली जात आहे. या महिन्याच्या सुरुवातीला डॉ. अदील राथर याच्या लॉकरमधून AK-47 सापडली होती, ज्यातून मोठे व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल उघड झाले होते. 2900 किलो स्फोटक जप्त झाल्यानंतर GMC मधील संशय अधिकच गडद झाला आहे.