दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 11:46 IST2025-11-12T11:45:54+5:302025-11-12T11:46:54+5:30
Delhi Blast: डीएनए चाचणीनंतर ओळख ठरणार; दहशतवादी डॉ. उमर मोहम्मद मरण पावला का? समोर येणार

दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
Delhi Blast:दिल्लीतील भीषण स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या 10 जणांपैकी 8 जणांची ओळख पटली आहे. मात्र, दोन मृतदेह एवढ्या छिन्नविछिन्न अवस्थेत आहेत की, त्यांची ओळख पटवणे अवघड झाले आहे. यातील एका मृतदेहाचे डोके नाही, तर दुसऱ्या ठिकाणी फक्त शरीराचे काही तुकडे आहेत. त्यामुळेच आता पोलिस आणि तपास यंत्रणा या दोघांची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणीचा आधार घेत आहेत.
तपासात असेही स्पष्ट झाले आहे की, स्फोटात वापरलेल्या i20 कारचा चालक आणि मुख्य संशयित डॉ. उमर मोहम्मद होता. सुरुवातीला असे म्हटले जात होते की, कारमध्ये तीन जण होते, मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये उमर एकटाच असल्याचे दिसून आले आहे.
स्फोटाची भीषणता
एफआयआरनुसार, हा स्फोट इतका तीव्र होता की, कार हवेत काही फूट उडाली आणि जवळच्या पोलिस चौकीची भिंत व छप्पर उद्ध्वस्त झाले. पोलिसांना कारमध्ये काही शरीराचे तुकडेही आढळले आहेत. त्यामुळे हे ठरवणे कठीण झाले आहे की, हे अवशेष कार चालकाचेच आहेत की, स्फोटानंतर परिसरातील उडून आलेले आहेत.
डीएनएद्वारे ओळख
एनआयए आणि दिल्ली पोलिसांनी डॉ. उमर मोहम्मदच्या आईचा डीएनए नमुना घेतला आहे आणि घटनास्थळी सापडलेल्या शरीराच्या तुकड्यांशी त्याची तुलना केली जाणार आहे. त्यामुळेच डॉ. उमर मोहम्मद या स्फोटात ठार झाला का? हा मोठा प्रश्न आहे. डीएनए मॅच झाला, तर अनोळखी मृतदेह उमरचा असल्याचे स्पष्ट होईल.
स्फोटाआधी उमरची हालचाल
तपासात समोर आले आहे की, उमर फरीदाबादमध्ये आपल्या सहकाऱ्यांच्या अटकेची माहिती इंटरनेटवर शोधत होता. तो सुनहरी मशिदीच्या पार्किंगमध्ये तब्बल तीन तास कारमध्ये बसून इंटरनेटवर हे सर्व शोधत होता. पोलिसांनी त्याच्या कारचा सुमारे 11 तासांचा ट्रेल मिळवण्यात यश मिळवले आहे.
स्फोट "अपघाती" असल्याची शक्यता
तपास अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासानुसार असे म्हटले आहे की, हा स्फोट कदाचित “अपघाती” होता. कारण फरीदाबादमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा भांडाफोड झाल्यानंतर उमर घाबरला आणि त्याने घाईघाईत बनवलेल्या स्फोटकासह आपले ठिकाण बदलण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी स्फोट झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
या स्फोटात मृत झालेल्या 10 पैकी 8 जणांची ओळख खालीलप्रमाणे पटली आहेः
मोहसिन - मेरठ
अशोक कुमार - बस कंडक्टर, अमरोहा
लोकेश - अमरोहा
दिनेश मिश्रा - श्रावस्ती
पंकज - ओला-उबर ड्रायव्हर
अमर कटारिया - श्रीनिवासपुरी
नौमान अंसारी - रिक्षाचालक
मोहम्मद जुम्मान - रिक्षाचालक