दिल्ली विमानतळ अंशत: बंद राहणार; 1300 विमानउड्डाणे रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 11:40 IST2018-10-04T11:40:01+5:302018-10-04T11:40:42+5:30
जर तुम्ही नोव्हेंबरमध्ये दिल्लीला विमानाने जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.

दिल्ली विमानतळ अंशत: बंद राहणार; 1300 विमानउड्डाणे रद्द
नवी दिल्ली : जर तुम्ही नोव्हेंबरमध्ये दिल्लीलाविमानाने जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील तीन पैकी एका धावपट्टीची दुरुस्ती करण्यात येणार असून नोव्हेंबरमध्ये 13 दिवसांसाठी धावपट्टी बंद राहणार आहे. यामुळे रोजच्या 100 विमान उड्डाणांवर परिणाम होणार असून 50 विमानांचे उड्डाण आणि 50 विमानांचे लँडींग बंद राहणार आहे.
देशातील व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या दिल्ली विमानतळावरील धावपट्टी नंबर (27/09) 15 ते 27 नोव्हेंबर पर्यंत बंद राहणार आहे. या धावपट्टीची मोठी दुरुस्ती करण्यात येणार असून याआधी तीन वर्षांपूर्वी ही दुरुस्ती झाली होती. याचा परिणाम दोन लाखांपेक्षा जास्त प्रवाशांवर होणार आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने नोव्हेंबरमध्ये दिल्लीमध्ये दाट धुके पसरण्याची शक्यता वर्तविली आहे. यामुळे प्रवाशांना आणखी त्रास होण्याची शक्यता आहे.
या काळात रद्द करण्यात आलेल्या उड्डाणांमध्ये देशांतर्गत आणि परदेश प्रवासातील विमानांचा समावेश आहे. जवळपास 100 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त 14 नोव्हेंबरला प्रगती मैदानात आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन केले आहे. याकाळात एक धावपट्टी बंद असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागू शकतो.