घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न, सहा महिन्यांनी कारमध्ये तरुणीचा शेवट; २१ वर्षीय पतीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 16:38 IST2024-09-02T16:33:51+5:302024-09-02T16:38:39+5:30
दिल्लीत एका २१ वर्षीय तरुणाने त्याच्या पत्नीची हत्या करुन तिचा मृतदेह कारमध्ये ठेवून पळ काढल्याचा प्रकार समोर आला आहे.

घरच्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न, सहा महिन्यांनी कारमध्ये तरुणीचा शेवट; २१ वर्षीय पतीला अटक
Delhi Crime : राजधानी दिल्लीत रविवारी रात्री एक हादरवणारं प्रकरण समोर आलं आहे. पत्नीची हत्या करून फरार होण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला पोलिसांनी पकडले आहे. एका पोलिसाला हा तरुणा रस्त्यात दिसला होता. मात्र, त्याच्या संशयास्पद हालचाली लक्षात आल्यानंतर त्या पोलिसाने त्याला पकडून चौकशी केली असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. आरोपी तरुणाने आपण पत्नीला कारमध्ये मारल्याचे सांगितले. लग्नानंतरही पती-पत्नी दोघेही एकत्र राहत नव्हते अशी माहिती समोर आली आहे.
पश्चिम दिल्लीतील राजौरी गार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खुनाची खळबळजनक समोर आली आहे. २१ वर्षीय तरुण पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह कारमध्ये टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यावेळी पोलिसाला आरोपीचे वर्तण संशयास्पद वाटले. पोलीस कर्मचाऱ्याने त्याला पकडून त्याची चौकशी केली असता, हा प्रकार उघडकीस आला.
२ सप्टेंबर रोजी पहाटे दीडच्या सुमारास ख्याला पोलीस ठाण्यात तैनात असलेले हेड कॉन्स्टेबल अजय यांनी राजौरी गार्डन पोलीस स्टेशनला आरोपी तरुणाबद्दल माहिती दिली. गौतम असे या आरोपीचे नाव आहे. तो पोलीस कर्मचारी यांना पाहून पळण्याचा प्रयत्न करत होता. अजय यांनी गौतमला संशयास्पद परिस्थितीत शर्टशिवाय फिरताना पकडले होते. त्याच्याकडे चौकशी केली असता गौतमने सांगितले की, मी माझ्या २० वर्षीय पत्नी मन्या हिची हत्या करून तिचा मृतदेह कारमध्ये टाकला आहे. पोलिसांनी या माहितीच्या आधारे शिवाजी महाविद्यालयाच्या लाल दिव्याजवळ उभ्या असलेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, गौतम रघुवीर नगर भागातील रहिवासी असून त्याचा विवाह २० वर्षांच्या मान्यासोबत मार्चमध्ये झाला होता. मान्याचे कुटुंबिय या लग्नासाठी तयार नव्हते. तरीही दोघांनीही घरच्यांच्या संमतीशिवाय लग्न केले. मात्र, लग्नानंतर पती-पत्नी दोघेही आपापल्या कुटुंबासोबत राहत होते आणि दोघेही अधूनमधून भेटत होते. रविवारी गौतम मान्याला भेटायला आला होता. त्यादरम्यान मान्याने गौतमला आपण एकत्र राहू असे सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि गौतमने मान्यावर चाकूने अनेक वार करून खून केला.
रात्री १० ते ११ दरम्यान हा सगळा प्रकार घडला. हत्येनंतर गौतम मान्याचा मृतदेह घेऊन फिरत होता आणि त्यानंतर त्याने गाडी शिवाजी महाविद्यालय लावली. त्यानंतर तो गाडीबाहेर पडला आणि तिथून चालत निघाला. त्याचवेळी पोलीस कर्मचाऱ्याने त्याला शर्टाशिवाय पाहिलं आणि त्याच्याकडे चौकशी सुरु केली.