'डॉक्टरांच्या हातात RDX असणे चिंताजनक'; संस्कारांशिवाय पदवी घातक असल्याचे राजनाथ सिंहांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 12:46 IST2026-01-03T12:34:02+5:302026-01-03T12:46:16+5:30
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्हाइट कॉलर टेररिझम या नव्या धोक्याबाबत देशाला सावध केले

'डॉक्टरांच्या हातात RDX असणे चिंताजनक'; संस्कारांशिवाय पदवी घातक असल्याचे राजनाथ सिंहांचे प्रतिपादन
Rajnath Singh: ज्या हातांनी रुग्णांच्या चिठ्ठीवर औषधोपचार लिहायला हवे, त्या हातांत आज आरडीएक्स सापडत आहे, ही देशासाठी अत्यंत चिंतेची बाब आहे, अशा शब्दांत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्हाइट कॉलर टेररिझम या नव्या धोक्याबाबत देशाला सावध केले आहे. राजस्थानमधील भूपाल नोबल्स विद्यापीठाच्या १०४ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
शिक्षण आहे, पण संस्कारांचा अभाव
राजनाथ सिंह यांनी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबरला झालेल्या कार बॉम्बस्फोटाचा संदर्भ दिला. या घटनेत सामील असलेले आरोपी उच्चशिक्षित डॉक्टर्स असल्याचे समोर आले आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, केवळ पदवी मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे. जर शिक्षणासोबत नैतिकता, चारित्र्य आणि मानवी मूल्ये नसतील, तर असे ज्ञान समाजासाठी उपयुक्त ठरण्याऐवजी घातक ठरू शकते.
'व्हाइट कॉलर टेररिझम' एक नवे आव्हान
देशात सध्या अत्यंत सुशिक्षित लोक समाज आणि राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये लिप्त होत असल्याची नवी प्रवृत्ती समोर येत आहे. याला राजनाथ सिंह यांनी 'व्हाइट कॉलर टेररिझम' असे म्हटले. "दहशतवादी होण्यासाठी अडाणी असणे गरजेचे नाही. अनेक दहशतवादी उच्च विद्याविभूषित असतात, पण त्यांच्याकडे विवेक आणि धर्माचा अभाव असतो. धर्म म्हणजे केवळ मंदिर-मशिदीत जाणे नव्हे, तर आपल्या नागरिकांविषयीची आणि राष्ट्राप्रती असलेली जबाबदारी होय," असं राजनाथ सिंह म्हणाले.
भारताची अर्थव्यवस्था आणि आत्मनिर्भरता
संरक्षण मंत्र्यांनी देशाच्या आर्थिक प्रगतीचा पाढा वाचताना युवकांना आशेचा किरण दाखवला. "२०१४ मध्ये जागतिक निर्देशांकात भारत ७६ व्या क्रमांकावर होता, जो आता ३९ वर पोहोचला आहे. भारत सध्या जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था असून २०३० पर्यंत तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. येत्या १५-२० वर्षांत भारत शस्त्रास्त्रांच्या बाबतीत पूर्णपणे आत्मनिर्भर होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
'संस्कारांशिवाय पदवी घातक'
"जेव्हा ज्ञान क्षमता वाढवते, तेव्हा त्या क्षमतेचा वापर नैतिकतेने होणे गरजेचे आहे. ज्ञान आणि संस्कारांची सांगड घातली तरच भारत एक 'नॉलेज इकॉनॉमी' म्हणून जागतिक स्तरावर आपले स्थान अधिक भक्कम करू शकेल," असेही सिंह यांनी नमूद केले.