विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 06:12 IST2025-10-08T06:12:36+5:302025-10-08T06:12:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मध्य प्रदेशातील छिंदवाडा परिसरात दूषित कफ सिरपमुळे होणाऱ्या मृत्यूचे सत्र थांबायला तयार नाही. मागील ...

विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य प्रदेशातील छिंदवाडा परिसरात दूषित कफ सिरपमुळे होणाऱ्या मृत्यूचे सत्र थांबायला तयार नाही. मागील १६ तासांत दीड ते दोन वर्षांच्या तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. ही सर्व बालके मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील परासिया येथील असून, त्यांच्यावर नागपुरातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू होते. कफ सिरप सेवनाने झालेल्या संशयित मृत्यूंची संख्या आता १६ वर पोहोचली आहे.
‘शर्थीचे प्रयत्न करूनही वाचवू शकलो नाही’
दूषित कफ सिरपच्या सेवनामुळे गंभीर झालेली दीड वर्षाची चिमुकली धानी डेहरिया ही २८ सप्टेंबर रोजी नागपूरच्या मेडिकलमध्ये दाखल झाली. शर्थीच्या उपचारानंतरही सोमवारी रात्री ११ वाजता तिचा मृत्यू झाला.
मेडिकलमध्येच उपचार घेत असलेली २ वर्षांची जयूषा यदुवंशी हिचा मृत्यू मंगळवारी दुपारी २ वाजता झाला. तर, २२ दिवसांपासून खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला दोन वर्षांचा वेदांश पवार याने मंगळवारी दुपारी ४ वाजता शेवटचा श्वास घेतला.
शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांना वाचवू शकले नाही, अशी खंत कलर्स हॉस्पिटलचे बालरोग तज्ज्ञ डॉ. राजेश अग्रवाल व मेडिकलच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. मनीष तिवारी यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.