'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 14:58 IST2026-01-14T14:56:59+5:302026-01-14T14:58:07+5:30
Dayanidhi Maran's Controversial Statement: द्रमुक खासदाराच्या वक्तव्याचा भाजपने तीव्र शब्दात निषेध केला.

'स्वयंपाक, मुले जन्माला घालणे, हेच उत्तर भारतीय महिलांचे काम', DMK खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
Dayanidhi Maran's Controversial Statement: तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुक पक्षाचे ज्येष्ठ खासदार दयानिधी मारन यांनी उत्तर भारतातील महिला आणि तामिळनाडूमधीलमहिलांची तुलना करणारे वादग्रस्त विधान केले आहे. या वक्तव्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला असून, भाजपकडून याविरोधात तीव्र टीका करण्यात येत आहे.
काय म्हणाले दयानिधी मारन?
एका कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना दयानिधी मारन म्हणाले की, 'तमिळनाडूमध्ये महिलांना शिक्षण आणि करिअरसाठी प्रोत्साहन दिले जाते. येथील मुलींनी आत्मविश्वासाने पुढे यावे, मुलाखती द्याव्यात, उच्च शिक्षण घ्यावे, अशी अपेक्षा असते. मात्र, उत्तर भारतात महिलांना कामावर जाऊ नका, घरातच रहा, स्वयंपाक करा आणि मुले जन्माला घाला, एवढेच काम तुमचे आहे, असे सांगितले जाते,' असे वक्तव्य मारन यांनी केले आहे.
‘द्रविड राज्य’ असल्याचा अभिमान
मारन पुढे म्हणाले की, 'आपले द्रविड राज्य तमिळनाडू हे एम करुणानिधी, सीएन अन्नादुरई आणि मुख्यमंत्री एमके स्टालिन यांची भूमी आहे. इथे महिलांची प्रगती म्हणजेच राज्याची प्रगती आहे. त्यामुळेच जागतिक कंपन्या चेन्नईत येतात. इथले लोक तमिळसह इंग्रजीतही निपुण आहेत आणि नेतृत्व करतात,' असा दावा त्यांनी केला. याशिवाय, तमिळनाडू हे देशातील सर्वोत्तम राज्य असून स्टालिन हे देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री असल्याचेही म्हटले.
भाजपचा जोरदार पलटवार
मारन यांच्या वक्तव्यावर BJP कडून तीव्र प्रतिक्रिया उमटली. तमिळनाडूतील भाजप प्रवक्ते नारायणन तिरुपती यांनी म्हणाले, 'दयानिधी मारन यांनी पुन्हा एकदा उत्तर भारतातील लोकांचा अपमान केला आहे. DMKकडून असे वक्तव्य वारंवार केले जाते,' असे ते म्हणाले. याशिवाय, भाजप नेत्या अनिला सिंह यांनीही टीका करत म्हटले की, 'हे विधान दुर्दैवी आहे. भारतात शक्तीची पूजा होते. उत्तर-दक्षिण असा भेद करून महिलांचा अपमान करणे आपल्या संस्कृतीविरुद्ध आहे. सोनिया गांधी, प्रियंका गांधी वाड्रा किंवा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत त्यांचे मत काय आहे?' असे त्या म्हणाल्या.
DMK कडून वक्तव्याचे समर्थन
वाद वाढत असतानाच DMKने दयानिधी मारन यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. पक्षाचे नेते टी. के. एस. इलंगोवन म्हणाले, 'महिलांच्या शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी कोणती पार्टी काय करते, हे त्या राज्यातील सरकारवर अवलंबून असते. तमिळनाडूमध्ये आम्ही महिलांसाठी लढलो, त्यांना शिक्षण दिले, रोजगार दिला आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणही दिले. उत्तर भारतात महिलांसाठी लढणारा कोणी नाही, ही वस्तुस्थिती आहे.'