निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 11:04 IST2025-09-14T11:03:41+5:302025-09-14T11:04:58+5:30

सरकारी शाळेत मध्यान्ह भोजनानंतर तब्बल ९० हून अधिक मुलं आजारी पडली. अचानक त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं

dausa 90 children fall sick after eating midday meal government school admitted hospital | निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

फोटो - आजतक

राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत मध्यान्ह भोजनानंतर तब्बल ९० हून अधिक मुलं आजारी पडली. अचानक त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकारी देवेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चुडियावास येथील एका शाळेतील ९० हून अधिक विद्यार्थी पोटदुखी आणि डोकेदुखीच्या तक्रारी घेऊन नांगल सीएचसीमध्ये आले होते. मुलांना दिलं जाणारं अन्न कदाचित निकृष्ट दर्जाचं होतं.

आता मुलांची प्रकृती स्थिर आहे. आम्ही जिल्हा स्तरावर तपासणीसाठी दोन पथकं पाठवली आहेत. अन्न सुरक्षा अधिकारी अन्नाची तपासणी करेल आणि शिक्षण विभागाची टीम पोषणात काय कमतरता होती हे शोधून काढेल. आम्ही अन्नाची गुणवत्ता तपासू आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

मुख्य वैद्यकीय अधिकारी आरके मीणा यांनी सांगितलं की, जिल्ह्यातील चुडियावास येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत शनिवारी सकाळी १५६ मुलांनी  चपाती आणि भाजी खाल्ली. पण पोषण आहार घेतल्यानंतर काही मुलांना उलट्या होऊ लागल्या आणि पोटदुखी होऊ लागली.

वैद्यकीय विभागाला याची माहिती मिळताच, एक पथक तात्काळ शाळेत पोहोचलं. त्यानंतर, मुलांची संख्या वाढत असल्याने, त्यांना सामुदायिक आरोग्य केंद्र नांगल राजवतन येथे दाखल करण्यात आले. काही वेळातच शाळेत शिकणाऱ्या ९२ मुलांना नांगल रुग्णालयात आणण्यात आलं.

कुटुंबातील सदस्यांनी काही मुलांना उच्च केंद्रात उपचारासाठी दौसा जिल्हा रुग्णालयात नेलं. एकूण ४९ मुलांना दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या सर्व मुलांवर डॉक्टरांच्या विशेष पथकाकडून उपचार केले जात आहेत.
 

Web Title: dausa 90 children fall sick after eating midday meal government school admitted hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.