दानिश निघाला ISI एजंट, दिल्लीत बसून करायचा हेरगिरी; ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 15:53 IST2025-05-22T15:52:21+5:302025-05-22T15:53:40+5:30
पाकिस्तान दूतावासात तैनात असलेल्या एहसान-उर-रहमान उर्फ दानिशबाबत मोठा खुलासा झाला आहे.

दानिश निघाला ISI एजंट, दिल्लीत बसून करायचा हेरगिरी; ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा खुलासा
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राचेपाकिस्तान दूतावासात काम करणाऱ्या पाकिस्तानी दानिशशी संबंध असल्याचे समोर आले होते. आता त्याच डॅनिशबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. एहसान-उर-रहमान उर्फ दानिश हा पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI एजंट असल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, दानिश इस्लामाबादमध्ये आयएसआय कार्यालयात तैनात होता. दानिशचा पासपोर्ट इस्लामाबादमधूनच जारी करण्यात आला होता.
21 जानेवारी 2022 रोजी दानिशचा भारतासाठी व्हिसा जारी करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, आयएसआय दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात आपल्या एजंटांना तैनात करुन भारतीयांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे काम करायची. ज्यांना पाकिस्तानी व्हिसा हवाय, त्यांच्याशी मैत्री करणे, ब्लॅकमेल करणे, हनी ट्रॅपमध्ये अडकवणे, पैशाचे आमिष दाखवणे...अशा विविध मार्गांना भारताविरुद्ध हेरगिरी करण्यास भाग पाडले जायचे.
ज्योती मल्होत्रा दानिशच्या सतत संपर्कात
हेरगिरीच्या आरोपाखाली पकडलेल्या ज्योती मल्होत्राने तिच्या कबुलीजबाबात म्हटले आहे की, दानिशच्या सतत संपर्कात होती. चौकशीदरम्यान ज्योती मल्होत्राने सांगितले की, ती 2023 मध्ये पाकिस्तानचा व्हिसा मिळविण्यासाठी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेली होती. तिथे तिची भेट अहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी झाली. दानिशचा मोबाईल नंबर मिळाल्यानंतर ती त्याच्याशी बोलू लागली.
ती दानिशच्या विनंतीवरुन दोनदा पाकिस्तानला गेली होती. दानिशच्या आग्रहामुळेच ती पाकिस्तानात अली हसनला भेटली, त्यानेच ज्योतीच्या राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली. पाकिस्तानमध्ये अली हसननेच ज्योतीची पाकिस्तानी सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांसोबतची बैठक आयोजित केली होती. तिथेच तिची भेट शकीर आणि राणा शाहबाज यांच्याशीही झाली. सध्या यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत असून, दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.