फेस रेकग्निशनमुळे कुंभमध्ये अडकले खतरनाक गुंड, वाँटेड गुन्हेगारांना ताब्यात घेतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 08:24 IST2025-02-20T08:14:26+5:302025-02-20T08:24:33+5:30
‘एफआरएस’ कॅमेऱ्यांच्या मदतीने गेल्या महिन्याभरात प्रयागराज पोलिसांनी कुंभमेळ्यातून २५ हून कुख्यात तसेच वाँटेड गुंडांना ताब्यात घेतले आहे.

फेस रेकग्निशनमुळे कुंभमध्ये अडकले खतरनाक गुंड, वाँटेड गुन्हेगारांना ताब्यात घेतले
योगेश पांडे
प्रयागराज : ५२ कोटींहून अधिक भाविकांनी आतापर्यंत भेट दिलेल्या महाकुंभात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. विशेषत: चेंगराचेंगरीनंतर ‘एआय’ तसेच फेस रिकग्निशन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गर्दीवर जास्त पाळत ठेवण्यात येत आहे. याच ‘एफआरएस’ कॅमेऱ्यांच्या मदतीने गेल्या महिन्याभरात प्रयागराज पोलिसांनी कुंभमेळ्यातून २५ हून कुख्यात तसेच वाँटेड गुंडांना ताब्यात घेतले आहे.
कॅमेऱ्यांशी निगडित सॉफ्टवेअरमध्ये पोलिसांनी वाँटेड गुन्हेगारांचे फोटो अगोदरच अपलोड करून ठेवले होते. त्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास २५ हून अधिक गुन्हेगारांना पकडण्यात यश आले आहे. पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने हे आकडे अधिकृत केलेले नाहीत. मात्र एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. याच कॅमेऱ्यांच्या मदतीने हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचेदेखील प्रयत्न करण्यात येतात. मात्र बहुतांश जनता चालत जात असून अनेकांचे फोटो व माहिती कुठल्याही डेटाबेसला नाही. त्यामुळे या फेस रेकग्निशन कॅमेऱ्यांचा वापर प्रामुख्याने असामाजिक तत्त्वे व कुख्यात गुंडांचा शोध घेण्यासाठीच करण्यात येत आहे.
५६ कोटी भाविक आले, पण ते मोजले कसे?
आतापर्यंत प्रयागराजला ५६ कोटींहून अधिक भाविकांनी भेट दिली आहे. एआय कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही आकडेवारी दिली जाते.
कॅमेऱ्यांचा डेटा सॉफ्टवेअरमध्ये टाकून अल्गोरिदमच्या आधारावर ही आकडेवारी जारी करण्यात येत आहे. यासाठी एका कंपनीची मदत घेण्यात आली आहे.