Crpf Madadgaar Helpline In Kashmir Gets 7k Calls In 6 Days And Abuses From Pakistani Callers | टवाळखोरांकडून सुरक्षा जवानांना अपशब्द; काश्मीरातील हेल्पलाइन नंबरवर पाकमधून आले कॉल्स 

टवाळखोरांकडून सुरक्षा जवानांना अपशब्द; काश्मीरातील हेल्पलाइन नंबरवर पाकमधून आले कॉल्स 

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील लोकांसाठी सीआरपीएफकडून हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे. सामान्य जनतेच्या मदतीसाठी ही हेल्पलाइन चालविली जाते. मात्र या नंबरचा पाकिस्तानच्या काही टवाळखोरांनी गैरवापर करत असल्याचं समोर येतंय. हेल्पलाइन नंबरवर ७ हजार ०७१ कॉल्स ११ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट दरम्यान आले. त्यातील १७१ कॉल्स भारताच्या बाहेरुन आले आहेत. 

लोक या हेल्पलाइनच्या सहाय्याने आपल्या कुटुंबातील आणि नातेवाईकांची विचारपूस करतात. मात्र पाकिस्तानमधील काही लोक सुरक्षा यंत्रणांच्या जवानांसोबत अपशब्द व्यक्त करुन त्यांचा राग काढतात. मदतीसाठी देण्यात येणाऱ्या हेल्पलाइनवर २ हजार ७०० कॉल्स सुरक्षा दलाच्या जवानांचे परिवाराकडून तर २ हजार ४४८ कॉल्स काश्मीरच्या बाहेरील लोक त्यांच्या कुटुंबाच्या काळजीपोटी करतात. १ हजार ७५२ कॉल्स गैरकाश्मिरी लोक राज्यातील स्थिती जाणण्यासाठी करतात. 

टोल फ्री नंबर १४४११ वर सऊदी अरबवरुन ४५ कॉल्स आले तर जगातील २२ देशांमधून काश्मीरमधील परिस्थिती जाणून घेण्यासाठी कॉल्स आलेले आहे. यात ३९ यूएई, १२ कुवैत, ८ इस्त्राईल, मलेशिया ७, तसेच यूके, सिंगापूर आणि बांग्लादेश याठिकाणाहून कॉल्स आलेले आहेत. ३ फोन कॉल्स कॅनडा, बहरीन, जर्मनी, फिलीपींस आणि थायलँडमधूनही फोन कॉल्स आले. 

जम्मू काश्मीरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी सांगितले की, पाकिस्तानी नंबरवरुनही काही फोन कॉल्स येत आहेत. त्यातील काही कॉल्स त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करण्यासाठी आले होते. तर बहुतांश कॉल्स आपला राग व्यक्त करण्यासाठी सुरक्षा जवानांना अपशब्द देण्यासाठी आले होते. राज्यात तैनात असणाऱ्या सुरक्षा दलाच्या जवानांसाठी हेल्पलाइन नंबर फायदेशीर ठरतोय. कारण त्यांच्या कुटुंबीयांकडून आलेल्या कॉल्समुळेही जवानांचे मनोबल उंचावत आहे.

५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने जम्मू काश्मीर पूनर्रचना विधेयक आणि कलम ३७० हटविण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यानंतर जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम हटविण्यात आलं. मात्र भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तान सैरभैर झालं. अनेक देशांकडे पाकिस्तानने मदतीची याचना केली मात्र चीनशिवाय इतर कोणत्याही देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे पाकिस्तानकडून धर्माच्या नावाखाली धमकविण्याचे प्रकार सुरु झाले आहेत.  
 

Web Title: Crpf Madadgaar Helpline In Kashmir Gets 7k Calls In 6 Days And Abuses From Pakistani Callers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.