राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 20:59 IST2025-10-24T20:57:23+5:302025-10-24T20:59:43+5:30
२०१९ नंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर आणि जम्मू आणि काश्मीर विधानसभा विसर्जित झाल्यानंतर २०२१ मध्ये राज्यसभेच्या चार जागा रिक्त झाल्या

राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर तर भाजपाने एका जागेवर विजय मिळवला. विशेष म्हणजे भाजपाचा हा विजय क्रॉस व्होटिंगमुळे झाला. भाजपा उमेदवार सत शर्मा यांना ३२ मते पडली तर नॅशनल कॉन्फरन्सच्या इमरान डार यांना केवळ २२ मते मिळाली. राज्यसभा निवडणुकीत केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरातील ८६ आमदारांनी मतदान केले. आम आदमी पक्षाचे आमदार मेहराज मलिक सध्या अटकेत आहेत. त्यांनी मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदानात सहभाग घेतला. दुपारी ४ वाजता मतदान संपल्यानंतर लगेच मतमोजणीला सुरुवात झाली.
मतमोजणीत सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सने राज्यसभेच्या ३ जागा जिंकल्या. या निकालावर पक्षाने निवेदन जारी करत म्हटलं की, चौधरी मोहम्मद रमजान यांनी पहिली जागा, सज्जाद किचलू यांना दुसऱ्या जागेसाठी विजयी घोषित केले आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार जी.एस ओबेरॉय जे शम्मी ओबेरॉय नावाने ओळखले जातात. ते राज्यसभेच्या तिसऱ्या जागेवर विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे चौथ्या जागेवर भाजपाचे नेते सत शर्मा यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या इमरान डार यांचा पराभव करून विजय मिळवला. सत शर्मा यांच्या विजयानंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी त्यांचे अभिनंदन केले.
राज्यसभेच्या या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सला काँग्रेस, सीपीआय आणि अपक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांची स्थिती मजबूत होती. ही निवडणूक केवळ राज्यसभेच्या जागांसाठी नव्हती तर येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी संदेश देणारी होती. नॅशनल कॉन्फरन्सचा विजय त्यांचा वाढता प्रभाव आणि आघाडीची एकता दाखवून देते, भाजपाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. मात्र कमी आमदार असताना एका जागेवर विजय मिळवण्यात भाजपाला यश आले आहे. चौधरी मोहम्मद रमजान यांना ५८ मते मिळाली, सज्जाद अहमद किचलू यांना ५७ मते मिळाली तर चौथ्या जागेवर भाजपाला ३२ मते आणि नॅशनल कॉन्फरन्सला २२ मते मिळाली.
२०१९ नंतरची पहिली निवडणूक
२०१९ नंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर आणि जम्मू आणि काश्मीर विधानसभा विसर्जित झाल्यानंतर २०२१ मध्ये राज्यसभेच्या चार जागा रिक्त झाल्या - मीर मोहम्मद फयाज, शमशेर सिंग, गुलाम नबी आझाद आणि नझीर अहमद लोये यांचा कार्यकाळ संपला होता. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आता पहिल्यांदाच राज्यसभेची निवडणूक पार पडली. एनसीने सप्टेंबरमध्ये आपले उमेदवार जाहीर केले होते त्यात प्रकृतीच्या कारणास्तव फारुख अब्दुल्ला यांना वगळण्यात आले होते. चौथ्या जागेसाठी काँग्रेसशी वाटाघाटी सुरू होत्या परंतु शेवटी एनसीने चार उमेदवार रिंगणात उतरवले.