"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 12:57 IST2025-05-14T12:53:38+5:302025-05-14T12:57:36+5:30
चीन आता अरुणाचल प्रदेशमधील अनेक ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारताने आता या कृतीचा तीव्र विरोध केला आहे.

"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
एकीकडे भारत पकिस्तानमध्ये तणावाची स्थिती असताना, चीनसोबतही तणाव वाढताना दिसत आहे. चीन त्यांच्या सीमेला लागून असलेल्या भारतीय राज्यांमध्ये काहीना काही कारवाया करत राहतो. चीन आता अरुणाचल प्रदेशमधील अनेक ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, भारताने आता या कृतीचा तीव्र विरोध केला आहे. तसेच, चीनची ही कृती अतिशय हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.
अरुणाचल प्रदेशशातील काही ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या या प्रयत्नांना भारताने विरोध केला आहे. "चीनच्या अशा हास्यास्पद प्रयत्नांनंतरही अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि कायम राहील, हे निर्विवाद सत्य कधीच बदलणार नाही", असे भारताने म्हटले आहे. दुसरीकडे, चीन बऱ्याच काळापासून अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा दक्षिण भाग असल्याचा दावा करत आहे.
नावं बदलण्याचा प्रयत्न हास्यास्पद!
अरुणाचल प्रदेशतील काही ठिकाणांसाठी चीनने नवीन नावे जाहीर केल्यानंतर भारताने ड्रॅगनला ठणकावलं आहे. परराष्ट्र मंत्रालायचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले की, "आमच्या लक्षात आले आहे की, अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे बदलण्याचा व्यर्थ प्रयत्न चीन करत आहे. अशी नावे बदलण्याचा निष्फळ प्रयत्न केल्याने अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग होता, आहे आणि कायमच राहणार आहे, हे सत्य तर बदलू शकत नाही."
अरुणाचल प्रदेश आमचा : चीन
मात्र, चीन अरुणाचल प्रदेशवर दावा करत आहे आणि तो आपला भाग असल्याचे म्हटले आहे. अरुणाचल प्रदेशातील लोकांना चीनमध्ये येण्यासाठी व्हिसाचीही गरज लागत नाही. यावर बोलताना चीनने म्हटले की, अरुणाचल हा चीनचा एक भाग आहे आणि म्हणून त्यांना आपल्याच देशात येण्यासाठी व्हिसाची आवश्यकता नाही. गेल्या वर्षीही चीनने अरुणाचल प्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणांच्या ३० नवीन नावांची यादी प्रसिद्ध केली होती, जी नंतर भारताने नाकारली होती.