Covid Cases: कोरोना वाढतोय! पंतप्रधान मोदींना भेटण्याआधी मंत्री, नेत्यांना RT-PCR चाचणी सक्तीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 12:26 IST2025-06-11T12:18:54+5:302025-06-11T12:26:12+5:30

Covid Update: देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान मोदींच्या बैठकांना आणि भेटीसाठी येणाऱ्यांना आरटीपीसीआर ही कोविड चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. 

Covid Cases: Corona is increasing! RT-PCR test mandatory for ministers, leaders before meeting Prime Minister Modi | Covid Cases: कोरोना वाढतोय! पंतप्रधान मोदींना भेटण्याआधी मंत्री, नेत्यांना RT-PCR चाचणी सक्तीची

Covid Cases: कोरोना वाढतोय! पंतप्रधान मोदींना भेटण्याआधी मंत्री, नेत्यांना RT-PCR चाचणी सक्तीची

Covid Update News: कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून, काही मृत्यूही झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकारकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या बैठकांसाठी येणाऱ्या मंत्र्यांना, तसेच त्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या व्यक्तींना आरटीपीसीआर म्हणजे कोरोना निदान चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

इंडिया टुडेने विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. रिपोर्टनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी येणाऱ्या सर्व मंत्र्यांना आरटी-पीसीआर चाचणी करणे सक्तीचे करण्यात आले आहे. 

जवळपास ७० जणांची कोरोना चाचणी

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसह खासदार, आमदार आणि इतर असे भाजपचे जवळपास ७० नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानी ही भेट होणार आहे. त्यासाठी या सर्व नेत्यांना आधी कोरोना चाचणी करावी लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

वाचा >>कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील पक्षाच्या सर्व नेते आणि आमदार, खासदारांना जेवणासाठी निमंत्रित केले आहे. सायंकाळी ७.३० वाजता ही भेट होणार आहे. 

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढली

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना रुग्णांची संख्या ७,१२१ वर पोहोचली आहे. मागील २४ तासात देशात ३०६ नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. 

सहा रुग्णांचा मृत्यू

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (१० जून) देशात कोरोनामुळे सहा रुग्णांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्याचबरोबर केरळामध्ये ३, तर कर्नाटकामध्ये २ रुग्णांचा मृत्यू झाला. 

गेल्या २४ तासांत सर्वाधिक कोरोना रुग्ण केरळमध्ये आढळून आले आहेत. केरळातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आता २२२३ वर पोहोचली आहे. त्यापाठोपाठ गुजरातचा क्रमांक असून, येथील रुग्णसंख्याही १२२३ इतकी झाली आहे. 

Web Title: Covid Cases: Corona is increasing! RT-PCR test mandatory for ministers, leaders before meeting Prime Minister Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.