राहुल गांधींवर कोर्टाची कारवाई, ठोठावला २०० रुपये दंड, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 17:49 IST2025-03-05T17:48:16+5:302025-03-05T17:49:03+5:30
Rahul Gandhi News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर कोर्टाने दंडात्मक कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशमधील लखनौ कोर्टाने २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोर्टाने दंडाची ही रक्कम वादी पक्षाचे वकील नृपेंद्र पांडे यांना देण्यात यावी असे आदेश दिले आहेत.

राहुल गांधींवर कोर्टाची कारवाई, ठोठावला २०० रुपये दंड, कारण काय?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर कोर्टाने दंडात्मक कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशमधील लखनौ कोर्टाने २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. कोर्टाने दंडाची ही रक्कम वादी पक्षाचे वकील नृपेंद्र पांडे यांना देण्यात यावी असे आदेश दिले आहेत.
कोर्टामध्ये व्यक्तिगतरीत्या उपस्थित न राहिल्याने न्यायाधीशांनी ही दंडात्मक कारवाई केली आहे. त्याबरोबरच १४ एप्रिल २०२५ रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेशही कोर्टाने राहुल गांधी यांना दिले आहेत. तसेच या तारखेला कोर्टात प्रत्यक्ष उपस्थित न राहिल्यात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कोर्टाने दिला आहे.
या प्रकरणी तक्रारकर्त्यांचे वकील नृपेंद्र पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांनी १७ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील अकोला येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख इंग्रजांचा नोकर आणि पेन्शन घेणारा असा केला होता. त्यानंतर खूप वाद झाला होता. तसेच राहुल गांधींविरोधात गुन्हेही दाखल झाले होते. या प्रकरणाची सुनावणी लखनौमधील एसीजेमएम कोर्टामध्ये सुरू आहे. मात्र या सुनावणीदरम्यान वैयक्तिकरीत्या उपस्थित न राहिल्याने कोर्टाने राहुल गांधी यांच्यावर २०० रुपयांच्या दंडाची कारवाई केली आहे. तसेच त्यांच्यावतीने उपस्थित राहिलेल्या वकिलांनाही फटकारले आहे.