कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 14:52 IST2025-10-07T14:51:53+5:302025-10-07T14:52:50+5:30
मृत निहाल धुर्वे आणि कबीर यादव या दोघांवरही डॉ. प्रवीण सोनी यांनीच उपचार केले होते आणि त्यांनीच हे कोल्ड्रिफ सिरप लिहून दिले होते.

कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
मध्य प्रदेशात भेसळयुक्त कफ सिरपमुळे सुरू झालेले बालकांच्या मृत्यूचे सत्र थांबायला तयार नाही. छिंदवाडा येथील डॉक्टर प्रवीण सोनी यांच्या अटकेनंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने निषेध व्यक्त केला असला तरी, आता बैतूल जिल्ह्यातून या प्रकरणाला अत्यंत गंभीर वळण मिळाले आहे. बैतूल जिल्ह्यातील आमला ब्लॉक येथे गरमित उर्फ निहाल धुर्वे आणि कबीर यादव या दोन बालकांचा या विषारी सिरपमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मृत निहाल धुर्वे याला पुरले असताना त्याच्यासोबत दफन केलेले प्रिस्क्रिप्शन आता आरोग्य विभागाच्या हाती लागले आहे, ज्यात याच वादग्रस्त डॉक्टर प्रवीण सोनी यांनी 'कोल्ड्रिफ सिरप' लिहून दिले होते.
कफ सिरपमुळे किडनी निकामी
बैतूलमध्ये दोन बालकांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क झाला आहे. याच आमला ब्लॉकच्या टीकाबर्री गावातील हर्ष नावाच्या साडेतीन वर्षांच्या बालकाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. हर्षवर सध्या नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत.
हर्षच्या काकांनी सांगितले की, सर्दी, खोकला आणि तापासाठी त्याला एक महिन्यापूर्वी डॉ. प्रवीण सोनी यांना दाखवले होते, पण तीन दिवसांत आराम न मिळाल्याने त्याला नागपूरला हलवण्यात आले.
मृत मुलाच्या कबरीतून मिळाले 'ते' प्रिस्क्रिप्शन
मृत निहाल धुर्वे आणि कबीर यादव या दोघांवरही डॉ. प्रवीण सोनी यांनीच उपचार केले होते आणि त्यांनीच हे कोल्ड्रिफ सिरप लिहून दिले होते. निहालच्या मृत्यूची पुष्टी झाल्यानंतर आरोग्य विभागाने तपासणी सुरू केली. आदिवासी परंपरेनुसार, निहालच्या कुटुंबियांनी त्याच्या औषधे, प्रिस्क्रिप्शन, खेळणी आणि इतर वस्तू कबरीत दफन केल्या होत्या.
सोमवारी निहालचे वडील जेव्हा कबर साफ करत होते, तेव्हा त्यांना कबरीमध्ये दफन केलेला डॉ. सोनीचा प्रिस्क्रिप्शनचा तुकडा सापडला. त्यात कोल्ड्रिफ सिरप लिहिल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यांनी त्वरित ते प्रिस्क्रिप्शन एसडीएम शैलेंद्र बडोनीया आणि सीएमओ डॉ. मनोज हुरमाडे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
डॉ. सोनींवर प्रश्नांची सरबत्ती
या तपासणीत आणखी एक गोष्ट उघड झाली आहे. निहालच्या बहिणीवरही डॉ. सोनी यांनी उपचार केले होते, मात्र तिला कफ सिरप दिले नव्हते. त्यामुळे तिचे प्राण वाचले. या घटनेनंतर आरोग्य विभागाने आसपासच्या गावांमध्ये घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे, जेणेकरून विषारी सिरप दिलेले इतर बालकं शोधता येतील आणि त्यांच्यावर तातडीने उपचार करता येतील.