coronavirus: कोरोनाच्या रुग्णांसोबत जनावरांपेक्षा वाईट व्यवहार, सुप्रीम कोर्टाने या राज्याला लगावली फटकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 16:47 IST2020-06-12T16:30:58+5:302020-06-12T16:47:29+5:30
एकीकडे आरोग्य कर्मचारी रुण्यांवर उपचारांसाठी प्रयत्न करत असले तरी काही ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांची हेळसांड होत असल्याच्या बातम्या येत आहेत.

coronavirus: कोरोनाच्या रुग्णांसोबत जनावरांपेक्षा वाईट व्यवहार, सुप्रीम कोर्टाने या राज्याला लगावली फटकार
नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातील बहुतांश भागात आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. एकीकडे आरोग्य कर्मचारी रुण्यांवर उपचारांसाठी प्रयत्न करत असले तरी काही ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांची हेळसांड होत असल्याच्या बातम्या येत आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने स्वतः या प्रकाराची दखल घेतली आहे. तसेच कोरोना बाधितांच्या मृतदेहांची हेळसांड होत आहे, तर काही ठिकाणी मृतदेह कचऱ्यामध्ये सापडत आहेत. लोकांना जनावरांपेक्षा वाईट वागणूक दिली जात आहे, असे मत नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती एम. आर. शाह यांच्या खंडपीठाकडे सोपवली आहे.
दरम्यान, या सुनावणीदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकार लगावताना दिल्लीतील रुग्णालयांची अवस्था चिंताजनक असल्याचे सांगितले. एमएचएच्या सूचनांचे पालन होताना दिसत नाही आहे. तसेच रुग्णालयांमध्ये मृतदेहांचीही योग्य व्यवस्था होत नाही आहे. काही प्रकरणात तर रुग्णांच्या नातेवाईकांना माहितीही दिली जात नाही आहे. काही प्रकरणात कुटुंबीयांना अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होता येत नाही आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
एका वृत्ताचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, एका सरकारी रुग्णालयात लॉबी आणि वेटींग एरियामध्ये मृतदेह पडलेले होते. तर वॉर्डमधील बहुतांश बेड रिकामे होते. तिथे अॉक्सिजन सलाईन ड्रिपची व्यवस्था नव्हती. असे बेड मोठ्या प्रमाणात रिकामे दिसत आहेत. तर दुसरीकडे रुग्ण भटकत फिरत आहेत.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी केंद्र सरकारलाही नोटीस बजावली आहे. तसेच दिल्लीसोबत महाराष्ट्र, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारकडून करण्यात येत असलेल्या कोरोनाच्या कमी चाचण्यांबाबतही नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीत मुंबई आणि चेन्नईच्या तुलनेत रुग्ण वाढले आहेत. मात्र चाचण्यांचे प्रमाण दर दिवशी सात हजार ते पाच हजार एवढे कमी का करण्यात आले, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला.
इतर महत्त्वाच्या बातम्या
त्या प्रस्तावाबाबत रशियाने घेतली भारताला प्रतिकूल भूमिका, चीनला दिले झुकते माप
जबरदस्त! LOCवर कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराचा दणका, १० चौक्या केल्या उद्ध्वस्त
अमेरिकेने चीनमध्ये पसरवले एलियन व्हायरस, होताहेत गंभीर परिणाम, चीनचा आरोप