coronavirus: चौफेर टीकेनंतर चीनने श्वेतपत्रिका काढली, कोरोना कधी, कसा, कुठे पसरला सगळी माहिती दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 07:58 PM2020-06-07T19:58:59+5:302020-06-07T20:16:48+5:30

कोरोना विषाणूच्या फैलावाबाबत चीनकडून घेण्यात आलेल्या भूमिकेकडे संशयास्पद नजरेने पाहण्यात येत असून, चीनवर चौफेर टीका होत आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनने आज श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे.

सध्या कोरोना विषाणूच्या फैलावाने जगभरात थैमान घातले आहे. चीनमधील वुहान शहरातून पसरलेल्या या विषाणूमुळे बलाढ्य अमेरिकेसह जगातील बहुतांश राज्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

कोरोना विषाणूच्या फैलावाबाबत चीनकडून घेण्यात आलेल्या भूमिकेकडे संशयास्पद नजरेने पाहण्यात येत असून, चीनवर चौफेर टीका होत आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनने आज श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली असून, यामध्ये कोरोना कधी, कसा आणि कुठे पसरला याची माहिती चीनने दिली आहे.

कोरोनाचा फैलाव होत असल्याची माहिती देण्यास उशीर केल्याचा आरोप चीनने पुन्हा एकदा फेटाळला आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण वुहानमध्ये २७ डिसेंबरला सापडला. तर न्यूमोनिया आणि माणसाकडून माणसाकडे संसर्ग होत असल्याची माहिती १९ जानेवारीला समजली. तसेच ही माहिती समोर आल्यानंतर कोरोनावर अंकुश ठेवण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यात आल्याचा दावा चीनने या श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून केला आहे.

कोरोना विषाणूबाबत माहिती लपवल्याचे तसेच जगाला याबाबत उशिरा सांगितल्याचे आरोप खोडून काढण्यासाठी चीनने या श्वेतपत्रिकेमधून दीर्घ स्पष्टीकरण दिले आहे.

चीनने कोरोनाबाबत पारदर्शकपणे माहिती दिली नाही, त्यामुळे जगभरात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाल्याचा आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प तसेच इतर नेत्यांनी केला होता.

चीनने प्रसिद्ध केलेल्या श्वेतपत्रिकेत दिलेल्या माहितीनुसार २७ डिसेंबर २०१९ रोजी वुहानमध्ये कोरोना विषाणूची ओळख पटल्यानंतर याबाबतची परिस्थिती हाताळण्यासाठी स्थानिक सरकारने तज्ज्ञांची मदत घेतली. तसेच कोरोना विषाणूहा माणसांमधून माणसांमध्ये पसरू शकतो याला १९ जानेवारी रोजी उच्चस्तरीय तज्ज्ञांच्या पथकाने सांगितले.

चीनमधील आघाडीचे श्वसनविकार तज्ज्ञ वांग गुआंगफा यांनी स्पष्ट केले की, १९ जानेवारीपूर्वी कोरोना विषाणू हा माणसांमधून माणसांपर्यंत पसरत असल्याचे पुरेसे पुरावे नव्हते.

जेव्हा कोरोना विषाणू हा माणसामधून माणसांमध्ये पसरतो, हे समजले तेव्हा त्याला फैलावण्यापासून रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या फैलावामधील चीनच्या भूमिकेबाबत अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली आहे. तसेच दिवसेंदिवस चीनबाबतचा संशयही वाढत आहे. अमेरिकेनेतर सुरुवातीपासूनच चीनविरोधात कारवाईची मागणी केली आहे. तसेच डब्ल्यूएचओने चीनबाबत घेतलेला भूमिकेचा निषेध म्हणून या संघटनेचे सदस्यत्वही सोडले आहे.