coronavirus : मोदी पुन्हा देशवासियांना संबोधित करणार; लॉकडाऊनबाबत मोठी घोषणा होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 14:51 IST2020-04-10T12:15:20+5:302020-04-10T14:51:59+5:30
देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी वाढणार की मर्यादित भागात लॉकडाऊन सुरू राहणार याबाबत देशभरात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

coronavirus : मोदी पुन्हा देशवासियांना संबोधित करणार; लॉकडाऊनबाबत मोठी घोषणा होणार?
नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. दरम्यान, लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिल रोजी संपत आहे. मात्र देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन लॉकडाऊनचा कालावधी वाढणार की मर्यादित भागात लॉकडाऊन सुरू राहणार याबाबत देशभरात तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना पुन्हा एकदा संबोधित करून लॉकडाऊनबाबत निर्णय जाहीर करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची शनिवारी व्हिडीओ कॉन्फ्रसिंगद्वारे महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळी लॉकडाऊनच्या नियमात काही महत्त्वपू्र्ण बदल होण्याची शक्यता आहे. आवश्यक सेवा वगळून आंतरराज्यीय वाहतुकीवरील निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच शाळा, कॉलेज आणि धार्मिक स्थळांवरील निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आर्थिक मंदीचा विचार करता काही विशिष्ट्य क्षेत्रातील उद्योगांना सोशल डिस्टंसिंगचे पालन करून काम सुरू करण्याची परवानगी देण्यात येऊ शकते.
कोरोना विषाणूमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुस्ती आली आहे, असे रिझर्व्ह बँकेने आपल्या पतधोरण अहवालात म्हटले आहे. लॉकडाऊनमुळे विमान वाहतुकीला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगच्या नियमाच्या पालनासह देशातील हवाई वाहतुकीला परवानगी मिळू शकते.
दरम्यान, बुधवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सध्याच्या परिस्थितीत लॉकडाऊन हटवणे शक्य नसल्याचे म्हटले होते. देशातील प्रत्येक नागरिकाच्या जीविताचे रक्षण करण्यास पंतप्रधान मोदींचे प्राधान्य असल्याचे सर्वपक्षीय बैठकीत सहभागी झालेल्या काही नेत्यांनी सांगितले होते. तसेच कोरोनाची साथ येऊन गेल्यानंतर देशातील जीवन पूर्वीसारखे राहणार नाही. तसेच जनतेला आपले वैयक्तिक आचरण आणि सामाजिक आचरणात बदल करावे लागतील, असे मत या नेत्यांनी मांडले.