CoronaVirus News bihar pmch issues death certificate to alive covid 19 patient | CoronaVirus News: पत्नीचा हट्ट 'कामी' आला, मृत नवरा जिवंत झाला; अंत्यसंस्कार होणार इतक्यात... 

CoronaVirus News: पत्नीचा हट्ट 'कामी' आला, मृत नवरा जिवंत झाला; अंत्यसंस्कार होणार इतक्यात... 

पाटणा: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. मार्चपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. एप्रिलमध्ये कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं सारे रेकॉर्ड ब्रेक केले. गेल्या आठवड्याभरापासून देशात दररोज कोरोनाचे एक लाखाहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा ताण आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सावळागोंधळ पाहायला मिळत आहे.

"४० तासांपासून स्मशानभूमीबाहेर रांगेत उभा आहे; पण वडिलांचे अंत्यसंस्कार होत नाहीएत"

बिहारमधल्या पाटणा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (पीएमसीएच) एक धक्कदायक घटना घडली आहे. एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित करून त्याचं मृत्यू प्रमाणपत्रदेखील तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पीएमसीएचमधील एका डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बाढ जिल्ह्यातल्या मोहम्मदपूरचा रहिवासी असलेल्या चुन्नू कुमारचं ब्रेन हॅम्रेज झालं. त्यानंतर त्याला पीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्याची कोरोना चाचणी केली गेली. ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांना कोरोना वॉर्डमध्ये हलवण्यात आलं.

याला काय म्हणावं! नर्स राहिली बसून; अधिकाऱ्यानं सरपंचाला लस दिली टोचून

उपचारादरम्यान चुन्नू कुमारची प्राणज्योत मालवल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून रविवारी त्याची पत्नी आणि भावाला देण्यात आली. त्यानंतर रुग्णालयानं घाईघाईत मृतदेह चुन्नूचा भाई मनोज कुमारकडे सोपवला आणि मृत्यू प्रमाणपत्रदेखील दिलं. प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली अंत्यसंस्कार सुरू असताना चुन्नूच्या पत्नीनं पतीचा चेहरा पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पत्नी हट्टाला पेटल्यानं मृतदेहावरील कपडा हटवण्यात आला. त्यावेळी तो मृतदेह दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचं पत्नी आणि कुटुंबियांच्या लक्षात आलं आणि सगळ्यांनाच धक्का बसला.

यानंतर पीएमसीएचमध्ये खळबळ उडाली. सध्या पीएमसीएचमध्ये चुन्नू यांच्यावर उपचार सुरू आहेत. पीएमसीएच प्रशासन आणि चुन्नू यांच्या कुटुंबियांनीदेखील याला दुजोरा दिला आहे. व्यक्ती जिवंत असताना त्याच्या नावे मृत्यू प्रमाणपत्र जारी करणं ही गंभीर स्वरुपाची चूक असल्याचं पीएमसीएचचे अधिष्ठाता डॉ. आय. एस. ठाकूर यांनी म्हटलं आहे. त्यांनी आरोग्य व्यवस्थापिका अंजली कुमारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News bihar pmch issues death certificate to alive covid 19 patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.