Coronavirus : कोरोनाकाळातील सभा भोवली, ४०० हून अधिक नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाली, १० जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 21:14 IST2021-05-11T21:13:35+5:302021-05-11T21:14:09+5:30
Coronavirus in India: नक्षलवाद्यांचा अड्डा बनलेल्या महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवरील जंगलांमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. मिळत असलेल्या माहिती नुसार ४०० हून अधिक नक्षलवाद्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

Coronavirus : कोरोनाकाळातील सभा भोवली, ४०० हून अधिक नक्षलवाद्यांना कोरोनाची लागण झाली, १० जणांचा मृत्यू
रायपूर - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने गेल्या सव्वा महिन्यापासून देशभरात धुमाकूळ घातला आहे. देशातील विविध भागात कोरोनाचा फैलाव झाला असून, आता नक्षलवाद्यांचा अड्डा बनलेल्या महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवरील जंगलांमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. मिळत असलेल्या माहिती नुसार ४०० हून अधिक नक्षलवाद्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, १० नक्षलवाद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (More than 400 Naxalites infected with coronavirus, 10 Death)
छत्तीसगडमधील बस्तर येथील नक्षलवाद्यांचा दलममध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. सुमारे ४०० नक्षलवादी कोरोनाबाधित झाले आहेत. तर १० नक्षलवाद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात कोरोनाचा शिरकाव झाल्याने नक्षलवाद्यांच्या गोटामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांकडून छत्तीसगडमधील बिजापूर आणि सुकमा जिल्ह्यातील सीमाभागांमध्ये एका सभेचे आयोजन केले होते. या सभेमध्ये शेकडो नक्षलवादी सहभागी झाले होते. आता याच सभेमधून कोरोनाचा फैलाव झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. गेल्या राही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे. मात्र देशभरात अद्यापही लाखो रुग्णांचे निदान होत आहे. तसेच एकूण कोरोनाबळींचा आकडाही अडीच लाखांच्या जवळ पोहोचला आहे.