CoronaVirus News : "कोरोना वेगाने पसरतोय, आपण डेंजर झोनमध्ये आहोत"; 'या' शहरात मास्क न लावल्यास थेट तुरुंगात रवानगी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 04:30 PM2021-03-19T16:30:00+5:302021-03-19T16:43:25+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील एका शहरात मास्कबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मास्क न लावल्यास आता थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.

CoronaVirus Marathi News indore in danger zone of corona 309 new patients found in day mask compulsory | CoronaVirus News : "कोरोना वेगाने पसरतोय, आपण डेंजर झोनमध्ये आहोत"; 'या' शहरात मास्क न लावल्यास थेट तुरुंगात रवानगी!

CoronaVirus News : "कोरोना वेगाने पसरतोय, आपण डेंजर झोनमध्ये आहोत"; 'या' शहरात मास्क न लावल्यास थेट तुरुंगात रवानगी!

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या आणि मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याच दरम्यान देशातील एका शहरात मास्कबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मास्क न लावल्यास आता थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. 

इंदूरमधील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे आता अधिकाऱ्यांनी मास्कशिवाय फिरणाऱ्या नागरिकांची रवानगी थेट तुरुंगात करण्यात येईल असं म्हटलं आहे. कलेक्टर मनीष सिंह यांनी "आपण डेंजर झोनमध्ये आहोत. सावध राहण्याची आवश्यकता आहे. निर्बंधांची अंमलबजावणी कठोर स्वरुपात करण्यात येणार आहे. मास्कशिवाय रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांना आता थेट तुरुंगात धाडण्यात येईल" असं म्हटलं आहे. एकाच दिवसात 2631 बेजबाबदार नागरिकांकडून तब्बल 3 लाख 28 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास 73 दिवसानंतर शहरात एका दिवसात 300 हून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. 25 डिसेंबरनंतर गुरुवारी पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या संख्येत संक्रमित रुग्ण समोर आल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे. इंदूरमध्ये गेल्या 24 तासांत 3305 नमुन्यांची चाचणी करण्यात आली, यातील 309 नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत तर 80 रुग्णांचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह दिसून आला. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात 8 लाख 77 हजार 973 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील 63 हजार 510 रुग्ण संक्रमित आढळले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

धोका वाढला! महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना 'या' राज्यात बंदी, कोरोनामुळे सरकारने घेतला मोठा निर्णय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेसवर 20 मार्चपासून बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशात गुरुवारी कोरोनाचे 917 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्या आकड्यानंतर राज्यात एकूण कोरोनारुग्णांची संख्या 2 लाख 71 हजार 957 झाली आहे. मध्य प्रदेशात सध्या 6 हजाराहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. अनेकांवर उपचार सुरू आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीत 20 मार्चपासून महाराष्ट्रातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेसवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, लोक आपल्या खासगी वाहनानं येऊ-जाऊ शकतात.


 

Web Title: CoronaVirus Marathi News indore in danger zone of corona 309 new patients found in day mask compulsory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.