Coronavirus : या मंदिरातून मोफत पुरवला जातोय ऑक्सिजन, दररोज शेकडो गरजूंना होतोय लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 23:31 IST2021-05-05T23:30:19+5:302021-05-05T23:31:23+5:30
Coronavirus in India : ऑक्सिजनची टंचाई वाढल्याने ऑक्सिजन सिलेंडरच्या काळ्याबाजारास सुरुवात झाली आहे. मात्र या परिस्थितीतही काहीजण असेही आहेत जे गरजूंना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.

Coronavirus : या मंदिरातून मोफत पुरवला जातोय ऑक्सिजन, दररोज शेकडो गरजूंना होतोय लाभ
पाटणा - देशात कोरोना विषाणूच्या फैलावाने चिंता वाढवलेली आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालयांमधील बेड्स संपत आले आहेत. तर रुग्णांसाठी लागणाऱ्या मेडिकल ऑक्सिजनचीही फार मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली आहे. रुग्णांच्या नातेवाईकांना तासनतास रांगेत उभे राहिल्यावर कुठे एखादा ऑक्सिजन सिलेंडर मिळत आहे. त्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरच्या काळ्याबाजारास सुरुवात झाली आहे. मात्र या परिस्थितीतही काहीजण असेही आहेत जे गरजूंना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. असाच एक कौतुकास्पद प्रकार बिहारमधील पाटणा येथून समोर आला आहे. येथे एका मंदिरामधून कोरोना रुग्णांना ऑक्सिजन मोफत पुरवला जात आहे. ( Mahavir Mandir in Patana provides free oxygen to hundreds of needy Corona positive people every day )
पाटणा येथील प्रसिद्ध महावीर मंदिरामधून गरजू रुग्णांना मोफत ऑक्सिजन पुरवला जात आहे. त्यामुळे हे मंदिर गरजू रुग्णांसाठी, जे रुग्ण घरूनच उपचार घेत आहेत अशांसाठी मोठा आधार ठरत आहे.
महावीर मंदिर न्यासाचे सचिव आचार्य किशोर कुणाल यांच्या पुढाकाराने मंदिराकडून जे लोक कोरोनाचा सामना करत आहेत. तसेच ज्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत, अशांना मोफत ऑक्सिजन पुरवला जात आहे. या मंदिरामधून मोफत ऑक्सिजन घेण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करावी लागते. तसेच त्यासाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड किंवा पॅनकार्ड दाखवावे लागते.