CoronaVirus : ADANI FOUNDATION is humbled to contribute Rs. 100 Cr to the PMcaresfund vrd | CoronaVirus : मोदींच्या आवाहनाला अदानींची साथ; 100 कोटी रुपयांचा मदतीचा हात

CoronaVirus : मोदींच्या आवाहनाला अदानींची साथ; 100 कोटी रुपयांचा मदतीचा हात

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलेलं असून, त्याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी निधीची कमतरता भासू नये, यासाठी मोदींनी PM-CARES फंडची निर्मिती केली आहे. मोदींनी PM-CARES फंडच्या माध्यमातून देशातील जनतेला मदतीचे आवाहन केले आहे. त्यानंतर अनेकांनी PM-CARES फंडला सढळ हस्ते मदत दिलेली आहे. अनेक उद्योगपतीसुद्धा मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

अदानी फाऊंडेशननं PM-CARES फंडसाठी १०० कोटी रुपये दिले आहेत. या मदतीव्यतिरिक्त आम्ही सरकार आणि जनतेची शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करू, असंही अदानी फाऊंडेशननं सांगितलं आहे. अदानी ग्रुपशिवाय जेएसडब्ल्यू समूहानंही कोरोनाविरोधातील लढ्यासाठी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखाली समूहानं आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक उपकरणे देणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच या कंपनीचे कर्मचारी एका दिवसाचं वेतनही दान करणार आहेत. सध्याचे कोरोनाचे संकट पाहता आपत्कालीन परिस्थितीत जेएसडब्ल्यू ग्रुप 'पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि मदत निधी' (पीएम-केअर फंड)मध्ये १०० कोटी रुपये देणार आहे, असंही जेएसडब्ल्यू समूहानं प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

 

सेलो ग्रुपने PM-CARES फंडसाठी साडेतीन कोटी रुपयांची देणगी दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी समूहाचे अध्यक्ष प्रदीप व पंकज राठोड यांचे आभार व्यक्त केले आहेत. याशिवाय अक्षय कुमारने 25 कोटी देण्याची घोषणा केली आहे, टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांनीही 11 कोटी देण्याचं जाहीर केलं आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच मोदींनी PM-CARES फंडची घोषणा केली होती. देशातील जनतेला मी आवाहन करतो, की त्यांनी पुढे येऊन PM-CARES फंडमध्ये आपले योगदान द्यावे. याचा उपयोग भविष्यातही, अशाच प्रकारची स्थिती निर्माण झाली, तर करता येऊ शकतो,' असे ट्विट करत पंतप्रधान मोदींनी, PM-CARES फंडच्या अकाउंट संदर्भातील महत्वाची माहितीही पोस्ट केली होती. PM-CARES फंडाच्या माध्यमातून मायक्रो डोनेशनही स्वीकारले जाईल. आपले हे डोनेशन आपत्ती व्यवस्थापन क्षमता बळकट करेल आणि नागरिकांच्या संरक्षणावरील संशोधनास प्रोत्सहित करेल. आपल्या भवी पिढ्यांसाठी निरोगी आणि अधिक समृद्ध भारत बनवण्यासाठी कसलीही कसर सोडू नका, असेही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. 

Web Title: CoronaVirus : ADANI FOUNDATION is humbled to contribute Rs. 100 Cr to the PMcaresfund vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.