कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 12:55 IST2025-05-20T12:54:29+5:302025-05-20T12:55:12+5:30
Corona Virus: गेल्या काही दिवसांपासून जगभरातील काही देशांसह भारतातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. सिंगापूर, थायलंड आणि हाँगकाँगमध्ये कोरोनाचा प्रकोप पाहालयला मिळत आहे. त्यामुळे आता भारतातही पुन्हा कोरोनाची लाट येणार का? अशी भीतीयुक्त शंका उपस्थित केली जात आहे.

कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती
गेल्या काही दिवसांपासून जगभरातील काही देशांसह भारतातही कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. सिंगापूर, थायलंड आणि हाँगकाँगमध्ये कोरोनाचा प्रकोप पाहालयला मिळत आहे. त्यामुळे आता भारतातही पुन्हा कोरोनाची लाट येणार का? अशी भीतीयुक्त शंका उपस्थित केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतातील तज्ज्ञ डॉक्टर आणि आयसीएमआरचे माजी संशोधक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितले की, कोविड-१९ ही आधी जागतिक साथ (Pandemic) होती. मात्र आता ती एक स्थानिक पातळीवरचा आजार (Endemic) बनली आहे. सिंगापूरसह अनेक आशियाई देशांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे भारताला कुठलाही धोका नाही आहे. जोपर्यंत या विषाणूमुळे लोकांचे रुग्णालयात दाखल होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण वाढत नाही, तोपर्यंत घाबरण्याचे कुठलेही कारण नाही.
सिंगापूरमधील आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार तिथे सध्या वाढलेले कोरोनाचे रुग्ण हे एलएफ.७ आणि एनबी.१.८ व्हेरिएंटमुळे वाढले आहेत. हा व्हेरिएंट सिंगापूरमधील ६० टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये संसर्गाचं कारण ठरला आहे. याबाबत गंगाखेडकर यांनी सांगितले की, जेएन.१ आणि त्याच्याशी संबंधित एलएफ.७ आणि एनबी.१.८ मध्ये इम्यून इव्हेजनचं वैशिष्ट्य आहे. मात्र हा व्हेरिएंट आधीच्या ओमिक्रॉन सबव्हेरिएंटच्या तुलनेत अधिक धोकादायक ठरू शकतात का हे सध्याच्या आकडेवारीवरून समजून येत नाही आहे. सध्यातरी भारतातील परिस्थिती स्थिर आहे, असे त्यांनी सांगितले.
डॉ. गंगाखेडकर यांनी पुढे सांगितले की, कोविड-१९ ला आता स्थानिक आजार म्हणून स्वीकारलं पाहिजे. वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनी कोविडबाबतच्या नियमांचं पालन करावं. हातांची नियमित स्वच्छता करावी, मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. जर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली तर भारत कोरोनावरील लसीचं उत्पादन वाढवू शकतो. मात्र सद्यस्थितीत तरी चिंताजन परिस्थिती नाही आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.