उत्तर प्रदेशातील रेल्वे स्थानकं, मंदिरं उडवण्याची धमकी; हाय अलर्ट जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 16:34 IST2018-06-06T16:34:26+5:302018-06-06T16:34:26+5:30
धमकीनंतर सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचना

उत्तर प्रदेशातील रेल्वे स्थानकं, मंदिरं उडवण्याची धमकी; हाय अलर्ट जारी
लखनऊ: लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेनं उत्तर प्रदेशातील अनेक रेल्वे स्थानकांसह कृष्ण जन्मभूमी आणि काशी विश्वनाथ मंदिरांमध्ये स्फोट घडवण्याची धमकी दिली आहे. या धमकीनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. याशिवाय पोलिसांनी राज्यात हाय अलर्टदेखील जारी केला आहे.
उत्तर प्रदेश पोलीस महासंचालकांनी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. एका पत्राद्वारे पोलीस महासंचालकांनी हे आदेश दिले आहेत. लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू शेखनं एका पत्राद्वारे उत्तर प्रदेशच्या सहारनपूर, हापूडसह अनेक रेल्वे स्थानकांवर बॉम्ब स्फोट घडवण्याची धमकी दिली असल्याचा उल्लेख महासंचालकांनी पोलिसांना पाठवलेल्या पत्रात आहे. यासोबतच मथुरामधील कृष्ण जन्मभूमी आणि बनारसमधील काशी विश्वनाथ मंदिर उडवण्याची धमकीही देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लष्कर-ए-तोयबाकडून धमकीचं पत्र मिळालं. दहशतवादी संघटनेचा कमांडर मौलाना अबू शेखनं हे पत्र पाठवलं आहे. 6 ते 10 जून या कालावधीत राज्यातील रेल्वे स्थानकं आणि मंदिरांमध्ये स्फोट घडवू, अशी धमकी यामधून देण्यात आली आहे. यानंतर सहारनपूर, हापूडसह अनेक रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याशिवाय कृष्ण जन्मभूमी आणि काशी विश्वनाथ मंदिराजवळील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणांवर अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.