‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 17:17 IST2025-11-22T17:16:33+5:302025-11-22T17:17:12+5:30
Akhilesh Yadav News: आता उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एसआयआरच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोग आणि भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.

‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
सध्या देशातील विविध राज्यांमध्ये निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या SIR विरोधात विरोधी पक्ष कमालीचे आक्रमक झाले आहेत. तसेच या एसआयआरमधून भाजपाला अनुकूल काम केलं जात असल्याच आरोप विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून केला जात आहे. आता उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एसआयआरच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोग आणि भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. आगामी निवडणुकांमध्ये निकालांवर प्रभाव टाकण्यासाठी भाजपा आणि निवडणूक आयोग मिळून समाजवादी पक्षाची मते कापण्याच्या रणनीतीवर काम करत आहे, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे.
अखिलेश यादव यांनी सांगितले की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघांमध्ये समाजवादी पक्षाला आघाडी मिळाली होती, तिथे आमची सुमारे ५० हजार मते हटवण्याची तयारी सुरू आहे. भाजपा आणि निवडणूक आयोग हे मिळून यासाठी काम करत आहेत. मात्र आम्ही सतर्क आहोत. हीच योजना पश्चिम बंगालमध्येही लागू केली जात आहे.
मतदार याद्यांच्या पुनरीक्षणामधून विरोधी पक्षांच्या मतदारांची नावं यादीतून हटवण्याचा प्रयत्न ही काही नवी बाब नाही. मात्र आता हे काम संघटितरीत्या केलं जात आहे. आमचा पक्ष सातत्याने बुथ स्तरावर समीक्षण करत आहे, तसेच प्रत्येक मतदाराचं नाव मतदार यादीमध्ये योग्य पद्धतीने नोंदवलं जाईल, याची खबरदारी घ्या, असे आदेश आमच्या पक्षाकडून कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना एक एसओपी द्यावा, जेणेकरून नेमकं काय करायचं आहे हे स्पष्ट होईल. तसेच उत्तर प्रदेशमध्ये एसआयआरसाठीची वेळ वाढवण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्याबरोबरच प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ५०,००० मते कापण्याचा कट आम्ही समाजवादी लोक उघळून लावू, असा इशाराही अखिलेश यादव यांनी दिला.