हिमाचल प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह यांनी भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौतवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कंगना मंडी खासदार म्हणून तिची जबाबदारी गांभीर्याने पार पाडत नाही आणि आपत्तीच्या वेळी जनतेत जाण्याऐवजी असंवेदनशील विधान करत असल्याचा आरोप केला आहे.
प्रतिभा सिंह म्हणाल्या की, "मंडी हा राज्यातील सर्वात मोठा संसदीय मतदारसंघ आहे आणि हिमाचलच्या दोन तृतीयांश लोकांचं प्रतिनिधित्व करणारी खासदार म्हणत आहे की तिच्याकडे फंड, एजन्सी किंवा कॅबिनेट नाही. अशा विधानांवरून असं दिसून येतं की, कंगना तिचं काम गांभीर्याने करत नाही."
"दरवर्षी ५ कोटी रुपये मिळतात"
"खासदारांना त्यांच्या मतदारसंघांसाठी दरवर्षी ५ कोटी रुपये मिळतात आणि ते आपत्तीच्या वेळी खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजनेच्या निधीतून खर्च करू शकतात. ते मदत करू शकतात, खराब झालेले रस्ते दुरुस्त करू शकतात आणि रेशनमध्ये योगदान देऊ शकतात."
देव तारी त्याला कोण मारी! हिमाचलमधील पुरात एका कुत्र्याने 'असा' वाचवला ६७ लोकांचा जीव
"निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"
"भाजपा खासदाराने तातडीने बाधित भागांना भेट देऊन लोकांच्या तक्रारी, समस्या ऐकायला हव्यात, मदतकार्यात मदत करायला हवी होती आणि नंतर केंद्रासमोर हे मुद्दे मांडायला हवेत. पण तिचे शब्द दुखावणारे आहेत आणि लोक तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप करत आहेत."
"संकटाच्या वेळी लोकांसोबत उभं राहणं"
"जेव्हा आपण आपत्तीग्रस्त भागांना भेट देतो आणि ज्यांनी सर्वस्व गमावलं आहे त्यांना भेटतो तेव्हा आपल्याला वेदना होतात आणि आपल्या डोळ्यात अश्रू येतात. संकटाच्या या काळात आपण त्यांच्यासोबत उभं राहणं महत्त्वाचं आहे" असं देखील प्रतिभा सिंह यांनी म्हटलं आहे. मंडी जिल्ह्यात ढगफुटी आणि भूस्खलनाच्या १० घटनांमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आणि ५ जण जखमी झाले. २८ जण अजूनही बेपत्ता आहेत.