बंगळुरू हिंसाचारात काँग्रेसच्या लोकांचा सहभाग; कर्नाटक सरकारचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 17:33 IST2020-08-19T17:23:35+5:302020-08-19T17:33:04+5:30
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बंगळुरू हिंसाचारासाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे.

बंगळुरू हिंसाचारात काँग्रेसच्या लोकांचा सहभाग; कर्नाटक सरकारचा गंभीर आरोप
बंगळुरू : कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथे झालेल्या हिंसाचारानंतर सोशल मीडियातील वादग्रस्त पोस्ट प्रकरणी पी. नवीन याला अटक करण्यात आली आहे. यावरून भाजपानेकाँग्रेसवर निशाणा साधला आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बंगळुरू हिंसाचारासाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे. सोशल मीडियातील पोस्टनंतर बंगळुरुमध्ये हिंसाचार झाला होता. ती पोस्ट अपलोड करणारा आरोपी काँग्रेसचा नेता आहे, असे लक्ष्मण सवदी यांनी म्हटले आहे. दरम्यान, याआधी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी आरोपी पी. नवीन याला पोलिसांनी अटक केली होती. आता त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बुधवारी प्रसार माध्यमांशी चर्चा केली. यावेळी राज्यातील हिंसाचारामध्ये एसडीपीआयमधील लोक सहभागी होते. त्यांच्यासमवेत काँग्रेसचे लोक या हिंसाचारात सामील होते. सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणारी व्यक्तीही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होता, असे लक्ष्मण सवदी यांनी म्हटले आहे.
मंगळवारी पी. नवीन याला न्यायालयीन कोठडीत पाठवून पोलिसांनी आपली कारवाई सुरू केली आहे. गेल्या आठवड्यातील बंगळुरुमधील हिंसाचाराच्या चौकशी संदर्भात पी. नवीनला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बंगळुरू (पूर्व) पोलीस उपायुक्त एस.डी. शरणाप्पा यांनी यासंदर्भात माहिती दिली.
पी. नवीनच्या सोशल मीडियावरील कथित पोस्टनंतर ११ ऑगस्टला रात्री सुरू झालेला हिंसाचार, जाळपोळ आणि तोडफोडीचा प्रकार बुधवारी पहाटेपर्यंत सुरू होता. पी. नवीन हा पुलकेशीनगर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांचा पुतण्या आहे. त्यामुळे संतप्त जमावाने आमदार अखंड श्रीनिवास मूर्ती यांचे निवासस्थान आणि डीजे हळ्ळी पोलीस ठाण्याला आग लावली. तसेच, पोलिसांची आणि अन्य खासगी वाहने जमावाने पेटवून दिली होती.
दरम्यान, सोशल मीडियातील पोस्टप्रकरणी पी. नवीनला १२ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्याने फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याची कबुली दिली आहे. मात्र, यापूर्वी त्याने हे नाकारले होते आणि त्याने आपले फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचा दावा केला होता.
आणखी बातम्या...
यूपीत पुराव्याशिवाय एन्काऊंटर होतायेत, असदुद्दीन ओवैसींचा योगी सरकारवर निशाणा
'सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल', बिहारच्या मुख्यमंत्र्यांची 'सर्वोच्च' निकालानंतर प्रतिक्रिया
भाजपा नेते वसीम बारी यांच्या हत्येचा बदला; लष्कर-ए-तय्यबाच्या कमांडरचा खात्मा
अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ, मुख्यमंत्र्यांचे भाजपाला चोख प्रत्युत्तर
शिक्षकांच्या पगारात २२ टक्क्यांची वाढ, 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय
"पीएम केअर्स पारदर्शी, कोरोना संकट काळात 3100 कोटी रुपयांची मदत"