शिक्षकांच्या पगारात २२ टक्क्यांची वाढ, 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 08:09 PM2020-08-18T20:09:38+5:302020-08-18T20:22:13+5:30

या निर्णयानंतर सरकारच्या तिजोरीवर 2765 कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे.

bihar election nitish kumar cabinet decision teachers salary increased by 22 percent | शिक्षकांच्या पगारात २२ टक्क्यांची वाढ, 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय

शिक्षकांच्या पगारात २२ टक्क्यांची वाढ, 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय

Next
ठळक मुद्देनियुक्त शिक्षकांच्या पगारामध्ये 22 टक्के वाढ केली आहे.नियुक्त शिक्षकांना 1 एप्रिल 2021 पासून वाढीव पगार मिळणार आहे. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त नवीन सेवा अटींच्या अधिसूचना जारी करण्यात येतील.

पटना : बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी  नियुक्त शिक्षकांच्या पगारामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नियुक्त शिक्षकांच्या पगारामध्ये 22 टक्के वाढ केली आहे.

नियुक्त शिक्षकांना 1 एप्रिल 2021 पासून वाढीव पगार मिळणार आहे. या निर्णयानंतर सरकारच्या तिजोरीवर 2765 कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे. तसेच, या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नियुक्त शिक्षकांसाठी सेवा अटींच्या नियमावलीला सुद्धा मान्यता देण्यात आली. नवीन सेवा अटी नियम लागू झाल्यानंतर शिक्षकांना पदोन्नती, बदली यासारख्या सुविधांचा लाभही मिळेल. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त नवीन सेवा अटींच्या अधिसूचना जारी करण्यात येतील. बिहार मंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर सुमारे साडेतीन लाख शिक्षकांना याचा लाभ मिळणार आहे.

दरम्यान, 15 ऑगस्ट रोजी गांधी मैदानावर केलेल्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शिक्षकांसाठी नवीन सेवा आणि अटींची नियमावली लागू करण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. बिहारमधील  शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून नवीन सेवा अटी नियमावली लागू करण्याची मागणी करत होते.

बिहार विधानसभा निवडणूकीपूर्वी नितीश कुमार यांनी या शिक्षकांची जुनी मागणी मान्य केली आहे. त्यामुळे या निर्णयानंतर नितीशकुमार यांना निवडणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बिहारमध्ये येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत.

येत्या 3 दिवसात निवडणूक आयोग बिहार निवडणुकीसाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रचारासंदर्भात येत्या तीन दिवसांत सविस्तर व सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
 

Web Title: bihar election nitish kumar cabinet decision teachers salary increased by 22 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.