Renuka Chaudhary: चक्क श्वानाला घेऊन काँग्रेस खासदार संसदेत पोहचल्या; सत्ताधारी भाजपानं घातला गोंधळ, काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 15:16 IST2025-12-01T15:15:03+5:302025-12-01T15:16:40+5:30
Winter Session of Parliament: रेणुका चौधरी यांनी त्यांच्या पाळीव श्वानाला संसद भवनात नेल्याने नवा वाद निर्माण झाला.

Renuka Chaudhary: चक्क श्वानाला घेऊन काँग्रेस खासदार संसदेत पोहचल्या; सत्ताधारी भाजपानं घातला गोंधळ, काय घडलं?
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी त्यांच्या पाळीव श्वानाला गाडीत घेऊन संसद भवनात पोहोचल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या घटनेवर भाजपच्या खासदार जगदंबिका पाल यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि रेणुका चौधरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
काँग्रेस खासदार रेणुका चौधरी त्यांच्या पाळीव श्वानासह संसदेच्या आवारात आल्याने वाद निर्माण झाला. भाजप खासदार जगदंबिका पाल यांनी या घटनेला विशेषाधिकाराचा गैरवापर असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाल्या की, "काँग्रेस खासदाराचे हे कृत्य लोकशाहीचा अपमान आणि संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहे. त्यांच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे. संसद ही राष्ट्रीय धोरणांवर चर्चा करण्यासाठी आहे. हे लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचे सभागृह आहे. काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांना कदाचित हे माहित नसेल की लोकसभा आणि राज्यसभा देशाच्या भावनांचे प्रतिनिधित्व करतात. काँग्रेस खासदाराने त्यांच्या श्वानाला संसदेत आणणे आणि नंतर प्रश्न विचारल्यावर स्पष्टीकरण देणे हे देशाला लाजिरवाणे कृत्य आहे."
रेणुका चौधरी यांची प्रतिक्रिया
काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या की, एखादा मुका प्राणी आत आला तर काय अडचण आहे? तो चावणार नाही. चावणारे अनेकजण संसदेत बसले आहेत. श्वानासाठी पास उपलब्ध असेल तर तो बनवा, असेही त्या म्हणाल्या.
पंतप्रधान मोदींवर टीका
सरकारने एक महिन्याचे अधिवेशन पंधरा दिवसांपर्यंत कमी केल्याने रेणुका चौधरी भडकल्या. "आम्ही सभागृहात कोणते मुद्दे उपस्थित करू, याची तुम्हाला भिती का वाटते? तुम्ही एक महिन्याचे अधिवेशन पंधरा दिवसांपर्यंत का कमी केले? कमी मुद्दे होते का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.