काँग्रेसचे खासदार लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात घुसले, त्यांना शिव्या दिल्या; भाजपा मंत्र्याने व्हिडीओ केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 12:37 IST2026-02-12T12:35:19+5:302026-02-12T12:37:30+5:30
Congress MPs in Lok Sabha Speaker Chamber: काँग्रेसच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात घुसून त्यांना शिव्या दिल्या आणि पंतप्रधान मोदींना धमकी दिली, असा आरोप भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याने केला आहे.

काँग्रेसचे खासदार लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात घुसले, त्यांना शिव्या दिल्या; भाजपा मंत्र्याने व्हिडीओ केला शेअर
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी एक व्हिडीओ शेअर काँग्रेसच्या खासदारांवर गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसचे २० ते २५ खासदार लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात घुसले आणि त्यांना शिवीगाळ केली. काँग्रेस खासदारांनी पंतप्रधान मोदींना धमकी दिली, असे रिजिजू यांनी व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी १० फेब्रुवारी रोजी लोकसभेतील गोंधळाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. पंतप्रधान मोदींचे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तराचे भाषण होणार होते. पण, काँग्रेसच्या महिला खासदार पंतप्रधानांच्या आसनाजवळ गेल्याने गोंधळ झाला होता.
किरेन रिजिजू यांनी गुरूवारी (१२ फेब्रुवारी) नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. "जेव्हा काँग्रेसचे २० ते २५ खासदार लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात गेले होते, तेव्हा बेकायदेशीरपणे काँग्रेस खासदाराने हा व्हिडीओ बनवला आहे. काँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना शिवीगाळ केली. त्यांनी पंतप्रधान मोदींना धमकी दिली. आमचा पक्ष चर्चा आणि वादविवादावर विश्वास ठेवतो आणि खासदारांना धमक्या देण्यासाठी प्रोत्साहन देत नाही", असा गंभीर आरोप रिजिजू यांनी केला आहे.
"प्रियांका गांधींसह वरिष्ठ नेते भांडणासाठी प्रोत्साहन देत होते"
रिजिजू म्हणाले की, "प्रियांका गांधी, के.सी. वेणुगोपाल यांच्यासह काँग्रेसचे अने वरिष्ठ नेते लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात उपस्थित होते. ते खासदारांना भांडण करण्यासाठी चिथावणी देत होते. लोकसभा अध्यक्ष हे खूप नरम स्वभावाचे व्यक्ती आहेत. नाहीतर खूप कडक कारवाई झाली असती", असा आरोप त्यांनी केला आहे.
This is the illegal video clip taken by a Congress MP when 20-25 Congress MPs entered the Chamber of Hon’ble Speaker, abused him and threatened Honb'le Prime Minister. Our party believes in debate & discussion and never encourage MPs to threaten physically. https://t.co/bezzALc7D3pic.twitter.com/iM0a50Z4rg
— Kiren Rijiju (@KirenRijiju) February 12, 2026
प्रियांका गांधींनी आरोप फेटाळले
किरेन रिजिजू यांच्या आरोपांवर बोलताना काँग्रेस खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या की, "आम्ही कुणालाही अपशब्द बोललेलो नाही. एक दोन खासदार जास्त नाराज होते आणि त्यांनी ते व्यक्त केले. त्यांनी (किरेन रिजिजू) असेही म्हटले आहे की, मी त्यांना प्रोत्साहन दिले, ते खोटं आहे. मी शांत बसलेले होते. शेवटी मी काही गोष्टी लोकसभा अध्यक्षांना शांतपणे सांगितल्या", असे सांगत प्रियांका गांधी हे आरोप फेटाळले.
विरोधकांकडून लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव
काँग्रेससह विरोधी पक्षातील काही खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावावर ९ मार्च रोजी सभागृहात चर्चा होण्याचा अंदाज आहे.
लोकसभा सचिवालयातील सूत्रांनी सांगितले की, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्याच दिवशी म्हणजे ९ मार्च रोजी लोकसभा अध्यक्षांना हटवण्याच्या प्रस्तावावर चर्चा होऊ शकते. हा अविश्वास प्रस्ताव निकाली निघेपर्यंत ओम बिर्ला हे अध्यक्षपदी असणार नाही.