Congress MLAs in Sonia Gandhis constituency praises up cm yogi adityanath he is very honest | सोनिया गांधींच्या निवडणूक क्षेत्रातील काँग्रेस आमदार म्हणाले,"योगींसारखे प्रामाणिक CM कदाचितच सापडतील"

सोनिया गांधींच्या निवडणूक क्षेत्रातील काँग्रेस आमदार म्हणाले,"योगींसारखे प्रामाणिक CM कदाचितच सापडतील"

ठळक मुद्देराकेश सिंह यांची सोमनाथ भारती यांच्यावरही टीकासोमनाथ भारती यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा चालवला पाहिजे, सिंह यांचं वक्तव्य

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचं निवडणूक क्षेत्र असलेल्या रायबरेलीतील काँग्रेसचे आमदार राकेश सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं आहे. राकेश सिंह हे हरचंदपुरमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्यासारखा प्रामाणिक मुख्यमंत्री आपण पाहिला नसल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. तसंच त्यांनी आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांच्यावही निशाणा साधला. सोमनाथ भारती यांच्यावर रायबरेलीमध्ये शाई फेकण्यात आली होती. 

राकेश सिंह यांनी सोमनाथ भारती यांच्यावर हल्लाबोल करत योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केलं. "उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसारखा प्रामाणिक आणि पूजनीय मुख्यमंत्री कदाचित कोणत्या ठिकाणी असेल. योगी आदित्यनाथ यांची अनेक ठिकाणी पूजा केली केली जाते. लोकं त्यांची देवाप्रमाणे पूजा करतात," असं योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करताना राकेश सिंह म्हणाले.  यादरम्यान त्यांनी आम आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांच्यावरही टीका केली. तसंच त्यांनी ज्या अयोग्य शब्दांचा वापर केला त्याविरोधात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तसंच त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला गेला पाहिजे, असंही ते म्हणाले. 

सोमनाथ भारती यांना रायबरेलीतील एका गेस्ट हाऊसमध्ये हिदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी घेरल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर मोठं वादंग उठलं होतं. यादरम्यान एका तरूणानं सोमनाथ भारती यांच्यावर शाई फेकली. यानंतर आमदार आणि पोलिसांनी एकमेकांना धमकी दिल्याचाही प्रकार घडला. याव्यतिरिक्त भारती यांनी एका पोलिसाला कामावरून कमी करण्याचीही धमकी दिली होती. 

राकेश सिंह यांचे मोठे बंधू प्रताप सिंह हे सध्या भाजपामध्ये आहेत. तर राकेश सिंह हे अद्यापही काँग्रेसमध्येच आहेत. त्यांनी अनेकदा काँग्रेसचा विरोधही केला होता. रायबरेलीमध्ये काँग्रेसचा जोर सध्या कमी होताना दिसत आहे. नुकताच काँग्रसच्या ३५ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता. दरम्य़ान, राकेश सिंह यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Congress MLAs in Sonia Gandhis constituency praises up cm yogi adityanath he is very honest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.