केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 11:04 IST2025-12-13T11:03:24+5:302025-12-13T11:04:01+5:30
या निवडणुका महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, ब्लॉक पंचायत आणि जिल्हा पंचायतीच्या लोकप्रतिनिधी निवडीसाठी घेण्यात आल्या आहेत.

केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
तिरुवनंतपुरम - केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. याठिकाणी एकूण १२०० स्थानिक संस्थांपैकी ११९९ महापालिका, नगरपालिकांसाठी ९ आणि ११ डिसेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान झाले. कन्नूर जिल्ह्यातील मत्तानूर नगरपालिकेत यावेळी निवडणुका झाल्या नाहीत कारण सप्टेंबर २०२७ मध्ये तेथे निवडणुका होणार आहेत. केरळमधील सात जिल्ह्यांमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात ७०.९१ टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात ७६.०८ टक्के मतदान झाले. या निवडणुका महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, ब्लॉक पंचायत आणि जिल्हा पंचायतीच्या लोकप्रतिनिधी निवडीसाठी घेण्यात आल्या आहेत.
तिरुवनंतपुरम, कोल्लम, पथनमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, इडुक्की आणि एर्नाकुलम या सात जिल्ह्यांमधील पंचायत, नगरपालिका आणि तीन महानगरपालिकांमधील ११,००० हून अधिक वॉर्डसाठी पहिल्या टप्प्यातील निवडणुका ९ डिसेंबर रोजी पार पडल्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा दुसरा टप्पा पहिल्या टप्प्यानंतर दोन दिवसांनी ११ डिसेंबर रोजी सात जिल्ह्यांमधील ५९५ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पार पडला. केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल २०२६ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीची लिटमस टेस्ट आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल अनेकदा मतदारांच्या मूडचे संकेत देतात. २०१० आणि २०१५ च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सत्ताधारी युतीच्या विरोधात गेल्या. त्यानंतर २०११ आणि २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी विजय मिळवला होता.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (UDF) सहापैकी तीन महानगरपालिकांमध्ये आघाडीवर आहे. कोची, त्रिशूर आणि कन्नूरमध्ये UDF आघाडीवर आहे. कोल्लम आणि कोझिकोडमध्ये माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडी (LDF) आघाडीवर आहे. तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत NDA आणि LDF यांच्यात चुरशीची लढत होत आहे. कन्नूर महापालिकेत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ १२ प्रभागांमध्ये, सीपीआयएमच्या नेतृत्वाखालील LDF ६ प्रभागांमध्ये आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए २ प्रभागांमध्ये आघाडीवर आहे. कोची महानगरपालिकेत चुरशीची लढत होत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये एलडीएफ विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला होता परंतु यूडीएफने जोरदार कमबॅक केले आहे. सध्या दोन्ही आघाड्या ३२-३२ जागांवर बरोबरीत आहेत तर भाजपा पाच प्रभागांमध्ये आघाडीवर आहे.
तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत एनडीएने २१ वॉर्डमध्ये आघाडी घेतली आहे तर एलडीएफ १६ वॉर्डमध्ये आणि यूडीएफ ११ वॉर्डमध्ये आघाडीवर आहे. कर्नाटकातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सकाळी ९:३० पर्यंतच्या कलांवरून याठिकाणी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएने ग्रामपंचायतींमध्ये आघाडी घेतल्याचे चित्र आहे. परंतु कोणत्याही महानगरपालिकेत ते आघाडीवर नाहीत. एका नगरपालिकेत त्यांची आघाडी आहे तर १९ ग्रामपंचायत जागांवर भाजपाची आघाडी आहे.