congress leader rahul gandhi conversation farmers social media platforms | "शेतकऱ्यांच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा एकदा स्वतंत्र होईल", राहुल गांधींची शेतकऱ्यांशी 'दिल की बात'

"शेतकऱ्यांच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा एकदा स्वतंत्र होईल", राहुल गांधींची शेतकऱ्यांशी 'दिल की बात'

नवी दिल्ली - केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाद्वारे मंजूर केलेल्या कृषी विधेयकांविरोधात विरोधकांसह शेतकरी संघटनांकडून आवाज उठवला जात आहे. मोदी सरकारविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील कृषी विधेयकावरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मात्र यानंतर आता राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांशी 'दिल की बात' च्या माध्यमातून संवाद साधला आहे. "शेतकऱ्यांच्या आवाजाने हिंदुस्थान पुन्हा एकदा स्वतंत्र होईल" असं म्हटलं आहे. 

राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी आवाज उठवल्याने हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले आणि आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आवाजाने हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळेल असं राहुल यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांशी केलेल्या चर्चेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जाहीर करण्यात येणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. एल. पुनिया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक छोटा व्हिडीओ ट्विट केला आहे. तसेच आपल्या थाळीत अन्न देण्यास शेतकरी विसरत नाहीत. मग त्यांना आपण कसं विसरू शकतो. ते आपल्यासाठी पीक उगवतात आणि आपण त्यांच्यासाठी आवाज उठवू नये?, राहुल गांधींच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अन्नदात्याचा हा आवाज ऐका, असं ट्वीट पुनिया यांनी केलं आहे.

शेतकऱ्यांना राहुल गांधींनी एमएसपी संपुष्टात येईल का? असा प्रश्न विचारला आहे. कृषी कायद्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असेल तर मग सरकार एमएसपीसाठी कायदा का करत नाही. अंबानी आणि अदानी यांच्यासारख्या उद्योगपतींचा कृषी कायद्याचा फायदा होणार आहे असं यावर शेतकरी म्हणाले आहेत. तसेच ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार होता, तसाच कारभार पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. जर आज महात्मा गांधी जिवंत असते तर त्यांनी या कायद्याला विरोध केला असता, असं एका शेतकऱ्याने सांगितलं. त्यावर शेतकर्‍यांच्या आवाजाने हिंदुस्थान स्वतंत्र झाला आणि आज पुन्हा एकदा हिंदुस्थान शेतकऱ्यांच्या आवाजाने स्वतंत्र होईल असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. 

"कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा, भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा"

कृषी विधेयकावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. "कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा आहेत. भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा" असं म्हणत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला आहे. तसेच कृषी विधेयकं मंजूर करताना उपसभापतींनी केलेल्या दाव्याचं त्यांनी खंडन केलं आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राच्या रिपोर्टचा फोटो त्यांनी ट्विट केला आहे. विधेयकं मंजूर करताना विरोधक जागेवर बसले नाही असं राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी म्हटलं होतं. मात्र वेगळंच चित्र दिसत आहे. यावरून राहुल यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला.

"शेतकऱ्यांचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेरही चिरडला जातोय"

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचं एक ट्विट केलं आहे. "कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा आहेत. शेतकऱ्यांचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेरही चिरडला जात आहे. भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा" असं म्हणत राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली आहे. याआधीही राहुल यांनी कृषी  विधेयकावरून सरकारवर जोरदार टीका करत निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी "एका चुकीच्या वस्तू आणि सेवा कराने सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (MSME) संपवलं. आता नवे कृषी कायदे आपल्या शेतकऱ्यांना गुलाम बनवतील" असं म्हटलं होतं. 

English summary :
congress leader rahul gandhi conversation farmers social media platforms

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: congress leader rahul gandhi conversation farmers social media platforms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.